सायनच्या परिचर्या इमारतीला १ मेची मुदत!
उपायुक्तांनी घेतला सायन रुग्णालयाचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महापालिकेच्या सायन रुग्णालयातील परिचारिका शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला आता १ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उपायुक्त शरद उघडे यांनी घेतलेल्या इमारतीच्या आढाव्यादरम्यान ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या बदलीनंतर पदभार स्वीकारलेल्या शरद उघडे यांनी बुधवारी (ता. २) दुपारच्या सुमारास सायन रुग्णालयाला भेट दिली. अहूलवालिया या कंत्राटदाराला या इमारतीच्या बांधकामाचे काम देण्यात आले आहे. दोन वेळा या कंत्राटदाराने दिलेली मुदत पूर्ण केली नसून, पुन्हा एकदा या भेटीदरम्यान उघडे यांनी १ मेपर्यंतची मुदत दिली आहे.
---------------------------------
विद्यार्थिनींसाठी शिकवण्यासाठीची सोय
या इमारतीचे काम होणे अत्यंत गरजेचे असून, येथे डॉक्टरांच्या राहण्याची सोय व त्यासोबतच परिचर्या शाळेच्या विद्यार्थिनींना शिकवण्यासाठीची सोय करण्यात आली आहे. आता उपलब्ध असलेल्या इमारतीला नवी इमारत तयार झाल्यानंतर तोडण्यात येईल आणि तिथे रुग्णांच्या सोयीसुविधा असणारी एक नवीन इमारत तयार केली जाणार आहे.
---------------------------------
कंत्राटदाराला ही इमारत पूर्ण करण्यासाठी डिसेंबर महिन्याची मुदत देण्यात आली होती, मात्र अपुऱ्या कामामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीचे होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे आता नवीन मुदत दिली गेली असून, किरकोळ कामे बाकी असून ही कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे वरिष्ठ सांगतात. या वेळी उपअधिष्ठाता डॉ. घनश्याम आहुजा आणि डॉ. विद्या महाले उपस्थित होत्या.