-दरवर्षी नवीन शहरप्रमुख निवडावा
esakal April 03, 2025 02:45 AM

दरवर्षी नवा शहरप्रमुख निवडावा
सुनील कुलकर्णी ः शिवसेना ठाकरे गटाची बैठक, सर्वांना संधी देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : ठाकरे गटाच्या चिपळूण शहरप्रमुखांची निवड करताना ती एका वर्षासाठी असावी. वर्षानंतर नवीन कार्यकर्त्याला संधी मिळावी, असे मत उपशहरप्रमुख सुनील कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच चिपळूण येथील बाळासाहेब माटे सभागृह झाली. या बैठकीत उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख आणि चिपळूण शहर म्हणून निवडीसंदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मते समजून घेण्यात आली. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी ही बैठक बोलावली होती. तत्कालीन शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या ठिकाणी शहर प्रमुखपद घेण्यासाठी पक्षात तब्बल सातजण इच्छुक असल्याचे समोर आले. त्यात संजय रेडीज, भैया कदम, सुनील कुलकर्णी यांच्यासह एकूण सातजण इच्छुक आहेत. या बैठकीत त्यांनी आपली मतेही व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी म्हणाले, शहरप्रमुख पदासाठी इच्छुक असलेले सर्वच उपशहरप्रमुख निष्ठावंत आणि पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही पक्षाचा उपयोग स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी केला नाही. मी १९८५ पासून पक्षात सक्रिय आहे. १९९५ मध्ये माझ्या प्रभागातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. पक्षाने आतापर्यंत दिलेल्या सर्व उमेदवारांचा मी प्रामाणिकपणे काम केला आहे यापुढेही करत राहीन; पण पक्षाने पद देताना दीर्घ मुदतीसाठी न देता वर्षासाठी द्यावे. एक वर्षानंतर नव्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी निवड व्हावी म्हणजे सर्वांना संधी मिळेल, असे मत मी बैठकीत मांडले आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले.
----
कोट
शहरप्रमुखपदासाठी इच्छुक असलेले सर्वच निष्ठावंत आहेत. त्यातून कोणा एकाची निवड होईल. पद मिळाले नाही म्हणून नाराज होणार नाही किंवा कोणीही पक्ष सोडणार नाही. शिवसेनेचा आदर्श इतर पक्ष घेतात. शहरप्रमुख पाच वर्षासाठी न निवडता एका वर्षासाठी निवडून शिवसेनेने नवा आदर्श घालून द्यावा.
- सुनील कुलकर्णी, उपशहरप्रमुख, चिपळूण

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.