Pattankodoli News : पट्टणकोडोलीतील शिवपुतळा न हटवता झाकून ठेवा; उपमुख्यमंत्र्याच्या प्रशासनाला सूचना
esakal April 03, 2025 03:45 AM

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) - जुने बसस्थानक परिसरात ३१ मार्च रोजी पहाटे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यासाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून आज पुन्हा प्रयत्न करण्यात आला.

मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मध्यस्थी करत या प्रकरणावर तोडगा काढला. प्रांताधिकारी मोसमी चौगुले आणि प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांना फोनद्वारे पुतळा न हटवत तो झाकून ठेवावा, रितसर परवाना घेतल्यानंतरच खुला करावा असे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

प्रशासनाची परवानगी न घेता पूर्णाकृती शिवपुतळा बसवल्याने हा पुतळा हटवण्यासाठी आज सकाळी १० च्या सुमारास अचानक पट्टणकोडोलीत संचारबंदी लागू करण्यात आली. मोठा पोलिस फौजफाटा तैनात करत प्रशासनाने पुतळा काढण्याच्या हालचाली केल्या.

परंतु आक्रमक शिवप्रेमींनी पुतळा न हटवण्याचे आव्हान पोलिसांना दिले. हा पुतळा विना परवाना असल्याने तो हटवण्यात येईल अशी भूमिका प्रांताधिकारी मोसमी चौगुले आणि डीवायएसपी समीर साळवे यांनी घेतली. तर पुतळा एक इंच सुद्धा हलवू देणार नाही, म्हणत शिवप्रेमींना जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यामुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

उपमुख्यमंत्र्याच्या आदेशाचे पालन करू

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तसाच राहू द्या. भगवे वस्त्र आणि सुरक्षेसाठी कागद घालून झाकून बंदीस्त करावा. शिवपुतळ्यासाठी रितसर परवानगी आपण लवकरात लवकर देऊ, त्यानंतर पुतळा खुला करण्यात यावा. अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिल्या.

तसेच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार गावातील शिवपुतळ्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल असे लेखी आम्ही प्रशासनाला लिहून दिले. यानंतर तातडीने पुतळा झाकण्याचे काम सुरू करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे आम्ही पालन करू.

- अमोल बाणदार, प्रभारी सरपंच

तब्बल ५ तास वाहतूक मार्गात बदल

पोलिसांनी अचानक गावातील मुख्य रस्ता असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूला बॅरिकेड लावल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु, हुपरीहून येणाऱ्या वाहनांना सांगवडेमार्गे सोडण्यात येत होते, तर कोल्हापूरहून येणाऱ्या वाहनांना पट्टणकोडोली गावातून मुख्य बाजारपेठमार्गे वाहने सोडण्यात येत होती. तब्बल ५ तास वाहतूक वळवण्यात आल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

अचानक संचारबंदी लागू करण्यात आल्याने गावाला पोलिस छावणीचे स्वरूपप्राप्त झाले होते. गावात तणावपूर्ण वातावरण बनल्याने काही ठिकाणी पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये किरकोळ वाद झाल्याने थेट लाठीचा प्रसाद देण्यात आला. तसेच आण्णा भाऊसाठे चौक, गावातील मुख्य बाजारपेठ, नवे बसस्थानक परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

आमदारांचा मध्यस्थीचा प्रयत्न

शिवपुतळा काढून ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. मात्र, शिवप्रेमी आपल्या भूमिकेवर ठाम होते. ११ च्या सुमारास आमदार अशोकराव माने यांनी घटनास्थळी पोहोचत माहिती घेतली.

यावर प्रशासन आणि शिवप्रेमींच्या भावना ऐकून घेत आमदार माने यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवप्रेमी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आमदारांनी नमस्कार करत निघून जाणे पसंद केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.