देऊळगाव राजा : परिसरात रविवारी आढळलेल्या पोलिसाच्या मृतदेहाने पोलिस दल हादरले होते. पोलिसाची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी जलद गतीने तपास चक्रे फिरविली.
काही तासातच प्रकरणाचा छडा लावून चौघा आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून मृत पोलिसाच्या गावातील नातेवाइकांनी कुख्यात गुंडांना सुपारी देऊन पोलिस जवानाचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
देऊळगाव राजा सिंदखेडराजा रस्त्यावरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलसमोरील वनविभाग परीक्षेत्रात एका कारमध्ये पोलिस जवान ज्ञानेश्वर म्हस्के यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. तपासाअंती पोलिस कर्मचाऱ्याची गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले होते. यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे व पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांनी सुनियोजित व वेगवान तपास केला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला दुपारीच ताब्यात घेतले. खून अनैतिक संबंधातून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीचे नाव बाबासाहेब म्हस्के(४२) असून तो गिरोला खुर्दच्या राजकारणात सक्रिय आहे. त्याची पत्नी माजी सरपंच आहे.
सध्या आरोपी बाबासाहेब म्हस्के याची पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे. इतर आरोपींमध्ये कमलाकर पंढरीनाथ वाघ (वय ४४), दिलीप बाजीराव वाघ (वय ५२), व बबन संपत शिंदे (वय ३८) तिघे राहणार ता. बंजार उंबरद, जिल्हा जालना या आरोपींचा समावेश आहे. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मित्राने रचला खुनाचा डावज्ञानेश्वर म्हस्के हे जालना पोलिस दलात राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिस म्हणून कार्यरत होते. मूळचे गिरोली खुर्द (रा. देऊळगाव राजा ) येथील रहिवासी आहेत. ते जालना येथे अंबड चौफुली भागात पत्नी व दोन अपत्यांसह राहत होते. आरोपी म्हस्के व मृतक पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के सोयरे असून एकमेकाचे घनिष्ठ मित्र होते. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच ज्ञानेश्वर यांचा काटा काढायचे बाबासाहेब याने ठरवले होते. त्यासाठी त्याने जालना येथील ‘टायगर’ नामक एका गुंडाला पाच ते सहा लाख रुपये सुपारी दिली होती.
दोन गुंडांना दिली सुपारीत्यांनी २९ मार्चचा दिवस निवडला टायगरने त्याची दोन माणसे त्या कामासाठी म्हस्के याच्या ताब्यात दिली. २९ मार्चच्या रात्री देऊळगाव राजा मार्गावरील एका हॉटेलमध्ये बाबासाहेब याने मृतक ज्ञानेश्वरला दारू पाजली. हॉटेलचे बिल देखील बाबासाहेब यानेच दिले. सदर प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना प्राप्त झाले आहे.
त्यानंतर बाबासाहेब आणि टायगर ने पुरवलेल्या दोन गुंडांनी ज्ञानेश्वर यांचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. मृतदेह गाडीत टाकून गाडी गिरोली खुर्द गावाजवळील आरजे इंटरनॅशनल स्कूल समोरील वनविभागाच्या जागेत नेऊन ठेवत आरोपी पसार झाले. रविवारी घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीवरून बाबासाहेब म्हस्के याला ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिलीअसून आरोपी पोलिसाच्या ताब्यात आहे.