Dr. Ambedkar Statue : डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या अनावरणाला केंद्रीय मंत्री चिराग पासवान उपस्थित राहणार; १० एप्रिलला सोहळा
esakal April 03, 2025 08:45 PM

अहिल्यानगर : मार्केट यार्ड चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १० एप्रिलला केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते होणार आहे. दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बसविण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती अहिल्यानगरमध्ये बसविण्यात येत आहे, हा देशातील दुसरा पुतळा आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचेही आमदार जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते संभाजीराव भिंगारदिवे, सुरेश बनसोडे, अजयराव साळवे, सुमेध गायकवाड, रोहित आव्हाड, किरण दाभाडे, सुनील क्षेत्रे, जयंत गायकवाड, सुनील शिंदे, विशाल गायकवाड, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, संजय जगताप, सिद्धार्थ आडाव्ह, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, विजय गायकवाड, गौतमी भिंगारदिवे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगताप म्हणाले, संविधानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी होत असतो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास मदत होत असून, शहराच्या वैभवात देखील मोठी भर पडणार आहे. घटनेची सुरक्षा देखील राखली जात आहे. डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा रहात असून, त्याचा चौथरा १८ फूट उंचीचा असून, त्यावरती १० फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. १० एप्रिलला भव्य अशा सोहळ्यात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

शहराच्या वैभवात भर

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, ही अनेक दिवसांची मागणी होती. त्यानुसार आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. मार्केट यार्ड चौकात डॉ. आंबेडकरांचा भव्य असा दहा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभा राहणार आहे. १८ फूट उंचीचा आकर्षक असा चौथरा उभारण्यात आलेला आहे. आता १० एप्रिलला डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.

दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जसा पुतळा बसविण्यात आलेला आहे, तसाच पुतळा अहिल्यानगर शहरात मार्केट यार्ड चौकात बसविण्यात येणार आहे. येत्या १० एप्रिलला पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी राज्यभरातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

- सुरेश बनसोडे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.