नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्वत:च्या संपत्तीचा तपशील जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी अलिकडेच सर्व न्यायाधीशांना यासंबंधी निर्देश दिले आहेत. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठी रोकड आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जात आहे. न्यायपालिकेत भ्रष्टाचाराशी निगडित चर्चेदरम्यान लोकांचा विश्वास कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व 33 न्यायाधीशांनी स्वत:च्या संपत्तीचा तपशील जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पूर्ण माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल. यापूर्वी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासमवेत अनेक न्यायाधीशांनी स्वत:च्या संपत्तीचा तपशील न्यायालयाला उपलब्ध केला आहे. परंतु आकडेवारी आतापर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर संपत्तीची घोषणा स्वैच्छिक आधारावर होणार आहे. नवी दिल्लीच्या लुटियन्स क्षेत्रात न्यायाधीश वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानात 14 मार्च रोजी आग लागल्यावर अधर्वट जळालेल्या नोटांची बंडलं आढळून आली होती. याप्रकरणी सरन्यायाधीश खन्ना यांच्याकडून स्थापन तीन सदस्यीय अंतर्गत समिती चौकशी करत आहे. न्यायाधीश वर्मा यांनी निवासस्थानी रोकड ठेवल्याची कुठलीच माहिती नव्हते, असे म्हटले आहे.