वयात येणाऱ्या मुलींसाठी...
esakal April 10, 2025 12:45 PM

सायली शिंदे - योगतज्ज्ञ

‘वयात येणं’ हा मुलींच्या जीवनातील एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. शरीरात आणि मनात अनेक बदल सुरू होतात - हार्मोन्स सक्रिय होतात, मासिक पाळी सुरू होते, भावना अनिश्चित होतात, आणि यासोबतच शरीरावर व चेहऱ्यावरही बदल जाणवू लागतात. कधी पाळी अनियमितही होते. याच टप्प्यावर योगसाधना आणि संतुलित आहार मुलींसाठी उपयुक्त ठरतो.

वयात येताना योगासनांचे फायदे
  • हार्मोन्सचे संतुलन राखतात.

  • मासिक पाळी नियमित व कमी त्रासदायक होते.

  • पचन सुधारते, आत्मविश्वास वाढतो.

  • चेहऱ्यावर तेज येते.

  • मन स्थिर राहते, चिडचिड कमी होते.

  • पाठीचा, कंबरेचा आणि मांड्यांचा विकास योग्य पद्धतीने होतो.

उपयुक्त योगासने
  • बद्धकोनासन : मजल्यावर बसून दोन्ही पायांची तळवे एकमेकांना भिडवून, गुडघे जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. हळूहळू पंखासारखे गुडघे वर-खाली हलवा. फायदे : पेल्विक क्षेत्रातील रक्तप्रवाह सुधारतो. मासिक पाळी नियमित होते. गर्भाशय आणि अंडाशय बळकट होतात.

  • भुजंगासन : पोटावर झोपा, दोन्ही हात खांद्याजवळ ठेवून वर छाती उचला. डोके वर व डोळे छताकडे. फायदे : हार्मोनल ग्रंथींवर परिणाम. पाठदुखी कमी. गर्भाशयावर हलका ताण.

  • सेतूबंधासन : पाठीवर झोपा, दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून, दोन्ही तळपाय जमिनीवर. मग कंबरेला वर उचला, हात जमिनीवर. फायदे : पेल्विक क्षेत्रातील स्नायू बळकट. थायरॉईड आणि पिट्युटरी ग्रंथी सक्रिय. मासिक पाळी नियमित.

  • वज्रासन + शशकासन : वज्रासनात बसून, पुढे झुकत शशकासन करा - कपाळ जमिनीवर आणि हात पुढे सरळ. फायदे : तणाव कमी. हार्मोन्स संतुलित. मन शांत.

काही महत्त्वाच्या सूचना
  • प्रत्येक आसन तीन ते पाच वेळा करावे.

  • आसन करताना शांत श्वास, आणि प्रत्येक हालचालीमध्ये स्थिरता असावी.

  • योगासने मासिक पाळीच्या दिवशी वगळता दररोज करावीत.

  • सुरुवात नेहमी प्रार्थना किंवा मंत्रपठणाने करावी - यामुळे मन स्थिर राहतं.

  • दर योगानंतर शवासन (शांत मुद्रा) ५ मिनिटे जरूर करावे.

काय खावे?
  • फळे : पपई, सफरचंद, डाळिंब, संत्रे.

  • हिरव्या भाज्या : पालक, मेथी, शेपू.

  • प्रोटिन्स : दूध, दही, अंडी, डाळी, हरभरा.

  • गूळ आणि तीळ : मासिक पाळी नियमित ठेवतात.

  • बदाम, अंजीर, खजूर : आयर्न, कॅल्शियम व झिंकचा स्रोत.

  • भरपूर पाणी : शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी

काय टाळावे?
  • पॅकेज्ड फूड, चिप्स, कोल्ड्रिंक्स

  • अति गोड किंवा तळलेले पदार्थ

  • रात्री उशिरा जेवण

  • मोबाईल/स्क्रीन टाइममध्ये सतत व्यग्रता

  • पालकांसाठी काही टिप्स

  • मुलीशी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे.

  • तिच्या भावनांना समजून घेणे आणि समुपदेशन देणे.

  • योगा किंवा मेडिटेशनचा सराव घरातच सुरू करावा.

  • तिचे शरीर बदलत असतानाच आत्मविश्वासही बळकट करावा.

वयात येणे हा एक परिवर्तनाचा; पण सुंदर टप्पा आहे. आजपासूनच मुलींसाठी योग ही एक सकारात्मक सवय बनवूया - तिच्या उज्ज्वल आणि संतुलित भविष्यासाठी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.