व्यक्तिमत्त्व आकर्षक बनविण्यासाठी...
esakal April 10, 2025 12:45 PM

स्मिता शेवाळे - अभिनेत्री

माझा पहिला चित्रपट ‘यंदा कर्तव्य आहे’. त्यावेळेला रसिका जोशी हे माझ्यासाठी मिळालेलं एक वरदान होतं. तिनं मला निरनिराळ्या गोष्टींचं निरीक्षण करायला शिकवलं. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून प्रगल्भ व्हायला मदत झालीच; परंतु माणूस म्हणून घडण्यातही मदत झाली. आम्ही एक नाटक बघायला गेलो होतो, तेव्हा तिनं सांगितलं, की या नाटकात ही जी मुलगी आहे ती अतिशय सुंदर दिसते. खरंतर ग्रीन रूममध्ये ओळख करून दिल्यानंतर मला ती खूप आकर्षक किंवा सुंदर अशी काही वाटली नव्हती. तिच्या दिसण्यात बऱ्याच त्रुटी वाटत होत्या; परंतु त्यानंतर नाटक बघितलं आणि त्या संपूर्ण प्रयोगात ती मला खरोखरच इतकी मोहक आणि आकर्षक वाटली.

अभिनय ही अशी कला आहे की, अंगिक आणि वाचक अभिनयाच्या जोरावर कुरूप व्यक्ती ही सुंदर दिसते. सौंदर्य किंवा आकर्षकता फक्त चेहऱ्यावर किंवा शरीरावर अवलंबून नसते. माणूस स्वतःला कसं सादर करतो, त्याचा स्वभाव, वृत्ती, सवयी आणि सर्जनशीलता यावर सारं काही अवलंबून असतं. आपण उगाचच सौंदर्य हे विशिष्ट संकल्पनेनं प्रमाणित केलेलं आहे. जसं की, गोरा रंग, सडपातळ बांधा, रेखीव नाक, लांबसडक केस, म्हणजे सुंदर...पण त्या प्रसंगानंतर अनुभवावरून सांगते, उंचीला कमी असणाऱ्या, घोगरा आवाज असणाऱ्या, छानसा सावळा वर्ण असणाऱ्या व्यक्ती आकर्षक दिसतात.

कारण त्यांचं असणं आणि सादरीकरण हे फार महत्त्वाचं असतं. आकर्षक दिसण्याच्या ठरावीक गैरसमजुतीवर आपण मात करू शकतो. वयाच्या ठरावीक टप्प्यात स्त्रियांच्या हार्मोन्समुळे किंवा आरोग्यविषयक समस्यांमुळे जाडी वाढणं, केस गळणं, स्त्रियांच्या स्तनांचं आकार बदलणं या गोष्टी घडतात. या गोष्टींची खंत करत राहिल्यास आत्मविश्वास कमी होतो. अशावेळी स्वतःला प्रथम स्थानी ठेवून सकारात्मक राहणं गरजेचं असतं. आपण केस पांढरे होणं सकारात्मकपणे घेऊ शकतो. अर्थातच ते काळे करायचे की नाही ही वैयक्तिक आवड असली, तरी होणारे बदल आपण सकारात्मकतेनं घेणं महत्त्वाचं असतं.

आकर्षक दिसणं म्हणजे आपण स्वतःबाबत प्रचंड खात्री बाळगणं. आयुष्यात जे काही करतो आहोत त्या बाबतीत आनंदी आणि समाधानी राहिल्यास चेहऱ्यावर सदैव प्रसन्नता राहते. आत्मिक सुख मिळवण्यासाठी प्रचंड सकारात्मकता हवी. आपल्याला शोभणाऱ्या गोष्टी जाणून घेऊन त्याचं कलेक्शन करणं, आवडणारे विचार किंवा एखादा लेख यांची कात्रणं जमवणं, आपल्या आवडी जपणं, छंद जोपासणं गरजेचं आहे. नवनवीन गोष्टी शिकण्याची आस ठेवल्यास आपलं मन प्रसन्न राहतं. या सगळ्या गोष्टींचा विचार केला, की आपण आपोआपच आकर्षक दिसतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.