भुसावळ- येथील भुसावळ ग्रामीण रुग्णालयात स्थापनेपासून अतिदक्षता विभाग (आयसीयू) केवळ कागदावर राहिला आहे. प्रत्यक्षात या विभागासाठी मनुष्यबळच नसल्याने अतिगंभीर रुग्णांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात नेण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांवर येत आहे. या रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी केली आहे. मात्र शास्त्रक्रियेचे साहित्य नसल्याने खोळंबा होत आहे. या रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
परिणामी, गंभीर रुग्ण असलेल्या सामान्यांना महागड्या रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो किंवा रुग्णाला घेऊन थेट जळगाव गाठावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
भुसावळ हे तालुक्याचे शहर आहे. येथून महामार्ग, लोहमार्ग गेले असून, या भागात आयुध निर्माणीचे दोन, वीजनिर्मितीचा एक असे तीन सरकारी कारखाने आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आहे. या अनुषंगाने अपघातांच्या घटना नित्याच्या असताना त्या सोबत विविध आजारांचे अतिदक्ष रुग्ण देखील उपचारार्थ येत आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय तालुक्याची स्थिती व शहराची लोकसंख्या गृहीत धरून रुग्णालयाचे बांधकाम केले आहे. मात्र या ठिकाणी अतिदक्षता विभाग अपेक्षित आहे.
या विषयी मंत्री संजय सावकारे यांनी विधानसभेत प्रश्न मांडावा, अशी मागणी आहे. त्यामुळे त्याच्या हालचाली होतील. मात्र, केवळ मनुष्यबळाअभावी येथील रुग्णालयात अनेक अडचणींशी व्यवस्थापनाला सामाना करावा लागत आहे. येथे येणारे रुग्ण व उपलब्ध मनुष्यबळ यात विसंगती आहे. ती दूर होण्याची गरज आहे.
भुसावळ ग्रामीण रुग्णालयाची इमारत नवीन असून, या ठिकाणी ३० खाटांची व्यवस्था आहे. शासनाने अतिदक्षता विभागाविनाच ट्रामा केअर सेंटरची २० खाटाची मंजुरी मिळवली आहे. मात्र शस्त्रक्रिया विभाग अर्धवट असून, शस्त्र साहित्य नसल्याने रुग्णांना जळगाव सामान्य रुग्णालयात रवाना केले जात आहे.
भुसावळ ग्रामीण रुग्णालयात वरिष्ठ पातळीवरून ‘आयसीयू’ ऐवजी ट्रामा केअर सेंटरला २० खाटांची मंजुरी मिळाली आहे. मात्र शस्त्रक्रिया विभागात शस्त्रसामुग्री उपलब्ध नसल्याने विभाग बंद आहे. अतिदक्ष रुग्ण दाखल झाल्यास त्यांना प्रथमोचार करून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले जाते. भुसावळ ग्रामीण रुग्णालयात शासनाने ‘आयसीयू’साठी मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा आहे.
-विजय कुरकुरे, वैद्यकीय अधीक्षक, भुसावळ ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटर
मनुष्यबळाची कमतरता
प्रसूती विभागाचे नियमित काम हे मूळ कामापेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे येथे ‘आयसीयू’ विभाग सुरू करणे गरजेचे आहे. त्या स्थितीत मनुष्यबळ शासनाने उपलब्ध करणे देखील गरजेचे आहे. किमान सहा खाटांचा आयसीयू सुरू करावयाचा झाल्यास तेथे किमान एक फिजिशियन, दोन मेडिकल ऑफिसर, तीन वेळ सत्रासाठी सहा परिचारिका असा किमान आठ ते दहा जणांचे प्रशिक्षित मनुष्यबळ शासनाने देणे अपेक्षित आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने भुसावळातील सर्वसामान्य रुग्णांची फरफट थांबणार आहे.