अहिल्यानगर : सहा जणांच्या टोळक्याने १७ वर्षीय युवकाला शिवीगाळ दमदाटी करीत फाईटरने व धारदार शस्त्राने, खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण करीत धमकी दिल्याची घटना पाईपलाईन रोडवरील वाणीनगर कमानीजवळ २९ मार्चला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
याबाबत सार्थक अमोल भांड (वय १७, रा. लेखानगर, एकविरा चौक, पाईपलाईन रोड) याने १ एप्रिल रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हा ट्रॅव्हल बसवरील चालक विनोद मिसाळ याला सोडण्यासाठी दुचाकीवरून वाणीनगर कमानीजवळ गेला असता तेथे गोरख मच्छिंद्र सुद्रिक (रा. बोल्हेगाव), दिनेश शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही रा. पंचवटीनगर), प्रणव ऊर्फ बबलू मोकाशे (रा. मोकाशे वस्ती, सावेडी), सचिन गोरे (पूर्ण नाव माहीत नाही. रा. वाणीनगर) व अन्य दोन अनोळखी इसम होते.
त्यांचे फिर्यादी सार्थकचा आतेभाऊ सोनू दत्तात्रय कोहक याच्याशी पैशाच्या व्यवहारावरून वाद झालेला होता. त्या वादाचा मनात राग धरून गोरख सुद्रिक याने त्याच्या हातातील फायटर सारख्या वस्तुने सार्थक याच्या तोंडावर नाकावर व डोक्यात मारले व धारदार शस्त्राने डोळ्याजवळ मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली.
या मारहाणीत सार्थक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याने याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गोरख सुद्रिक, दिनेश शिंदे, प्रणव मोकाशे, सचिन गोरे व अन्य दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.