55315
जिल्हा परिषदेचे कर्मचारी गुंतले स्वच्छतेत
कार्यालयांची साफसफाई ः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेची अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयात अनेक वर्षांपासून धूळखात पडलेले जुने साहित्य (भंगार) तसेच अनावश्यक फाईल, कागदपत्राची गाठोडी अखेर आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालय स्वच्छतेच्या सूचनेवर त्या-त्या विभागाने बाहेर काढली. त्यामुळे प्रत्येक विभाग स्वच्छ झाला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचा सुरू असलेला कारभार आणि कार्यालयीन व्यवस्था याबाबत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या दरम्यान त्यांनी कार्यालयीन स्वच्छतेबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. प्रत्येक कार्यालय स्वच्छ व नीटनेटके असले पाहिजे. जुन्या आणि वापरता नसलेल्या वस्तू, बंद इलेक्ट्रिक-इलेक्ट्रॉनिक साहित्य तत्काळ बाहेर काढा, अशा सक्त सूचना दिल्या होत्या. स्वच्छतेबरोबरच कार्यालयात उशिराने येणाऱ्या व कामचुकार कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन दणका दिला. यामुळे कामचुकार कर्मचारी-अधिकारी यांनी चांगलाच धसका घेतला आहे. आज जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर स्वच्छतेत गुंतल्याचे दिसून आले.
---
सीईओंमुळे कामातील मरगळ दूर
गेली कित्येक वर्षे धूळ खात पडलेल्या टाकाऊ साहित्याचा जिल्हा परिषद तळमजल्यावर ढीग जमा झाला आहे. यात जुनी कपाट, लाकडी टेबल, खुर्च्या, पंखे, कागदपत्रांची गाठोड्यांचे ढीग आहेत. श्री. खेबुडकर यांच्या काम करण्याच्या कार्यपद्धतीमुळे शासकीय कामातील मरगळ दूर होऊन प्रशासकीय कामकाजात गती आलेली दिसत आहे. त्यामुळे काहींच्या चेहऱ्यावर खुशी तर काहींच्या चेहऱ्यावर गम अशी स्थिती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत होती.