आयपीएल 2025 स्पर्धेत सर्वात निराशाजनक कामगिरीचा टॅग आता सनरायझर्स हैदराबाद संघावर लागला आहे. पहिल्या सामन्यात धावांचा डोंगर रचताना पाहून समालोचकही अतिरंजित उपमा देत बरंच काही सांगत होते. पण दुसऱ्या सामन्यापासून सनरायझर्स हैदराबाद संघाला घरघर लागली आहे. इतकंच काय तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने 80 धावांनी पराभूत केलं. आयपीएल इतिहासात सनरायझर्स हैदराबादचा हा सर्वात मोठा पराभव आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. पण या धावांचा पाठलाग करताना संपूर्ण संघ फक्त 120 धावांवरच गारद झाला. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 163 धावांवरच डाव आटोपला, तर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 190 धावांचा बचाव करू शकली नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाचं नाव मोठं आणि दर्शन खोटं अशी स्थिती आहे. हैदराबादची अशी स्थिती पाहून वीरेंद्र सेहवागने खिल्ली उडवली आहे.
वीरेंद्र सेहवागने क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, ‘पंजाबच्या संघाने आपली कुऱ्हाड हैदराबादला दिली आहे. आता ते आपल्या पायावर मारत आहेत. काय बोलू, या टीमसाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांनी प्रथम गोलंदाजी करताना केकेआरला 200 धावा करू दिल्या आणि त्यानंतर 120 धावांवर ऑलआऊट झाले. हैदराबादने मागचे तीन सामने सलग गमावले आहेत आणि आपल्याच पायावर कुऱ्हाड मारत आहेत. पहिल्यांदा ते 190 धावा वाचवू शकले नाहीत. मग 160 हून अधिक धावा करताना मागे राहिले. आता 200 धावांचा पाठलाग करताना 120 धावांवर ऑलआऊट झाले.’
वीरेंद्र सेहवागने पुढे सांगितलं की, ‘कोलकात्याच्या खेळपट्टीवर फार काही धोकादायक नव्हतं. पण तरीही या संघाची फलंदाजी पूर्णपणे फेल गेली.’ या कामगिरीमुळे हैदराबादचे फॅन्स निराश असतील यात काही शंका नाही. कोलकात्यातही चाहत्यांनी षटकार आणि चौकारांची आशा वर्तवली होती. पण निराश होत परतावं लागलं. या कामगिरीमुळे हैदराबादची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.