IPL 2025 : जसप्रीत बुमराहचं कमबॅकसाठी सज्ज! या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता
GH News April 04, 2025 07:09 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी फार काही चांगली झालेली नाही. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात कमबॅक केलं आहे. पण विजयी ट्रॅक कायम ठेवण्याचं आव्हान आहे. असं असताना स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचं कमबॅक होणार की नाही याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, दुखापतीमुळे जानेवारीपासून उपचार सुरु आहेत. आता मैदानात परतण्याच्या तयारीत आहे. त्याने नुकतंच बंगळुरुतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये गोलंदाजीचा वर्कलोड वाढवला आहे. म्हणजेच फिटनेस टेस्ट पास करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून फिट असल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आयपीएलमध्ये सामने खेळण्यास उतरणार आहे. बुमराह आणखी दोन सामने खेळणार नसल्याचं यातून स्पष्ट होत आहे. 4 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स आणि 7 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सामने होणार आहेत. या दोन्ही सामन्यात जसप्रीत बुमराह नसणार हे स्पष्ट आहे. मात्र 13 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. पण याबाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेलं नाही.  येत्या आठवड्यात त्याच्या फिटनेसबाबत अधिकृत अशी माहिती मिळेल.

जसप्रीत बुमराह आपल्या दुखापतीची काळजी घेत आहे. पूर्णपणे फिट झाल्यानंतरच मैदानात पुनरागमन करण्याची मन केलं आहे. 28 जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका डोक्यात ठेवूनच तयारी सुरु असल्याचं बोललं जात आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात पराभव, तर एका सामन्यात विजय मिळाला आहे.

जसप्रीत बुमराहची आयपीएल करिअरची सुरुवात 2013 मध्ये झाली होती. त्याने 12 वर्षात 133 सामन्यात 165 विकेट घेतल्या आहेत. तर 2023 मध्ये पाठदुखीच्या त्रासामुळे खेळला नव्हता. त्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या शेवटच्या सामन्यात पुन्हा एकदा त्रास जाणवू लागला. त्यानंतर उपचार सुरु आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकला होता. आता कमबॅक केल्यानंतर त्याचा फॉर्म आणि गोलंदाजीत काही फरक पडतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.