कोलकाता नाईट रायडर्सने गुरुवारी (३ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या १५ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला ८० धावांनी पराभूत केले आहे. कोलकातामधील इडन गार्डन्सवर हा सामना पार पडला. कोलकाताने हा सामना जिंकत यंदाच्या हंगामातील दुसर्या विजयाची नोंद केली. मात्र सनरायझर्स हैदराबादचा सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हैदराबादच्या या पराभवामुळे पाँइंट्स टेबलमध्येही मोठे बदल झाले आहेत.
या सामन्यात कोलकाताने हैदराबादसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ १६.४ षटकात १२० धावांवर सर्वबाद झाला. कोलकाताच्या सर्वच गोलंदाजांकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. त्यातही वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी कमालीची गोलंदाजी केली.
सुरुवात अत्यंत खराब झाली होती. वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनी मिळून पहिल्या तीन षटकातच हैदराबादच्या तीन फलंदाजांना बाद केलं. ट्रॅव्हिस हेड ४ धावांवर अभिषेक शर्मा २ धावांवर आणि इशान किशन २ धावांवर बाद झाला. इशान किशनचा अफलातून झेल अजिंक्य रहाणेने घेतला.
त्यानंतर नितीश रेड्डी आणि कामिंडू मेंडिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण ७ व्या षटकात नितीश कुमरा रेड्डीला १९ धावांवर आंद्रे रसेलने सुनील नरेनच्या हातून झेलबाद केले. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या कामिंडू मेंडिसलाही १० व्या षटकात नरेनने २७ धावांवर बाद केले. अनिकेत वर्माही फार काही करू शकला नाही. त्याला ६ धावांवर वरुण चक्रवर्तीने माघारी धाडले.
तरी नंतर हेन्रिक क्लासेनला कर्णधार पॅट कमिन्सने साथ देण्याचा प्रयत्न केला. क्लासेन हैदराबादची अखेरची आशा होती. पण क्लासेनलाही ३३ धावांवर वैभव अरोराने १५ व्या षटकात चूक करण्यात भाग पाडले.त्याचा झेल मोईन अलीने घेकला. क्लासेनने २१ चेंडूत ३३ धावा केल्या.
१५ व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर वरुण चक्रवर्तीने पॅट कमिन्स (१४) आणि सीमरजीत सिंग यांना बाद करत हैदराबादला दोन धक्के दिले. शेवटी १७ व्या षटकात हर्षल पटेल ३ धावांवर बाद झाला आणि हैदराबादचा डाव संपला.
गोलंदाजी करताना वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेलने २ विकेट्स घेतल्या. हर्षित राणा आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद २०० धावा केल्या. कोलकाताने क्विंटन डी कॉक आणि सुनील नरेन यांच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या. पण अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशीने ८१ धावांची भागीदारी करत डाव सावरला.
रहाणेने ३८ धावा केल्या. रघुवंशीने ३२ चेंडूत ५० धावांची खेळी केली. शेवटी रिंकु सिंग आणि वेंकटेश अय्यरने आक्रमक खेळ केला. वेंकटेशने वादळी खेळ करताना २९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावांची खेळी केली. रिंकूने १७ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबादकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, झीशान अन्सारी, हर्षल पटेल आणि कामिंडू मेंडिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
कोलकाताचा हा दुसरा विजय असल्याने त्यांचे ४ गुण झाले आहेत. त्यामुळे त्यांनी दहाव्या क्रमांकावरून थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांनी मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना मागे टाकले आहे. या सर्व संघांचे २ गुण आहेत. हैदराबादची १० व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
पहिल्या चार क्रमांकावर अनुक्रमे पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत. या चारही संघांचेही ४ गुण आहेत. पण नेट रन रेटच्या फरकामुळे क्रमवारी निश्चित होते.