बँकॉकमध्ये बिमस्टेक गटाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे हंगामी सरकार प्रमुख मोहम्मद युनूस एकत्र बसले होते. थायलंडच्या पंतप्रधान पैटोगटार्न शिनावात्रा यांनी या मेजवानीचे आयोजन केले होते. युनूस यांच्या कार्यालयाने चाओ फ्राया नदीच्या काठावर असलेल्या हॉटेल शांगरी-ला मध्ये बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोदींच्या शेजारी बसलेले फोटो शेअर केले आहेत.
बांगलादेशचे हंगामी सरकार प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याशी मोदी शुक्रवारी चर्चा करणार आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर मोदी आणि युनूस यांची ही पहिलीच भेट असेल. सहाव्या बिमस्टेक परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे.
बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आणि हसीना यांना सत्तेतून पायउतार केल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध बिघडले असताना मोदींची युनूस यांच्यासोबतची भेट महत्त्वाची मानली जात आहे. युनूस यांच्या नुकत्याच झालेल्या चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे, ज्यात त्यांनी ईशान्य प्रदेशाविषयी काही भाष्य केले होते जे भारताला आवडत नव्हते.
युनूस यांच्या कार्यकाळात बांगलादेशची पाकिस्तानशी जवळीक वाढली आहे. बांगलादेशचे लष्करही पाकिस्तानसोबत युद्धसराव करणार आहे. याशिवाय दोन्ही देशांचे लष्करी शिष्टमंडळही एकमेकांच्या देशांना भेटी देत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही युनूस यांना आपल्या देशात येण्याचे आमंत्रण दिले आहे.
बीजिंग दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात मोहम्मद युनूस म्हणाले होते की, ‘ईशान्य भारतातील सात राज्यांना सेव्हन सिस्टर्स म्हणतात. हा भारताचा भूपरिवेष्ठित प्रदेश आहे. त्यांना समुद्रात जाण्यासाठी मार्ग नाही. या प्रदेशातील समुद्राचे आपण एकमेव संरक्षक आहोत. चीनसाठी ही मोठी क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. मोहम्मद युनूस यांचे हे विधान समोर आल्यानंतर भारतातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हे लज्जास्पद आणि चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे.
बांगलादेशचे मुख्य सल्लागार युनूस यांच्या ईशान्य भारताविषयीच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे त्यांच्या एका प्रमुख सहकाऱ्याने म्हटले आहे. रोहिंग्या आणि इतर प्राधान्यक्रमांसाठी मोहम्मद युनूसचे उच्च प्रतिनिधी खलिलुर रहमान यांनी माध्यमांना सांगितले की, “त्यांनी (युनूस) प्रामाणिक विधान केले. जर लोकांनी याचा गैरसमज केला तर आम्ही ते थांबवू शकत नाही.’