64 हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराला केंद्रीय मंत्रिमंडळाची संमती, नौदलाचे सामर्थ्य वाढणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत फ्रान्सकडून आपल्या नौदलासाठी 26 अत्याधुनिक राफेल विमाने खरेदी करणार आहे. या संबंधीचा करार करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. या विमानांसाठी भारताला 64 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून या विमानांमुळे भारताच्या नौदलाचे सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
ही सागरी राफेल युद्ध विमाने भारतनिर्मिती ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहून नौकेवर कार्यान्वित होणार आहेत. या विमानांपैकी 22 विमाने एक आसनी राफेल-एम या प्रकारातील असून ऊर्वरित 4 विमाने द्विआसनी प्रशिक्षण विमाने असतील. ही सर्व विमाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सिम्युलेटर्स यांनी युक्त असतील. ही विमाने चालविण्याचे प्रशिक्षण भारतीय वैमानिकांना देण्यात येईल. तसेच या विमानांना पाच वर्षांपर्यंत कामगिरी आधारित साधनसामग्रीचा पुरवठाही करण्यात येईल, अशी माहिती भारतीय संरक्षण विभागाने दिली आहे.
सुटे भागही मिळणार
या 64 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारांमध्ये भारताला या विमानांचे सुटे भाग, आधुनिकीकरण सामग्री, अत्यावश्यक साधने आणि शस्त्रसंभारही पुरविला जाणार आहे. तसेच भारताने यापूर्वीच फ्रान्सकडून जी 36 राफेल विमाने खरेदी केली आहेत, त्या विमानांसाठी आधुनिकीकरण सामग्री, शस्त्रसंभार आणि सुटे भागही या व्यवहाराच्या अंतर्गत पुरविले जाणार आहेत. भारताने 2016 मध्ये केलेल्या करारानुसार ही 36 राफेल विमाने फ्रान्सकडून खरेदी केलेली आहेत. तो करार भारत आणि फ्रान्सच्या सरकारांमध्ये झालेला करार असल्याने त्यात कोणताही मध्यस्थ नव्हता. ही सर्व 36 विमाने भारताला मिळालेली आहेत.
37 ते 65 महिन्यांमध्ये मिळणार
नव्या करारानुसार 26 राफेल विमाने भारताला या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यापासून 37 ते 65 महिन्यांच्या कालावधीत दिली जाणार आहेत. हा नवा करारही जुन्या कराराच्या धर्तीवर करण्यात आला असून तोही दोन्ही सरकारांच्या मधला करार आहे. 2030 ते 2031 पर्यंत भारताला ही सर्व 26 राफेल विमाने मिळणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वातील संरक्षण सामग्री क्रय मंडळाने या करारात 4 परिवर्तने केली होती. या विमानांमध्ये भारत आणि फ्रान्स संयुक्तरित्या विकसीत करत असलेली एईएसए रडार्स बसविण्यात येणार होती. तथापि, त्यामुळे या विमानांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली असती आणि विमाने मिळण्यासाठी अधिक कालावधी लागला असता. त्यामुळे या रडारांशिवाय ही विमाने खरेदी केली जाणार आहेत. पण या रडारांचे विकासकार्य होत राहणार आहे.
नौदलाकडे विमानांचा तुटवडा
भारताच्या नौदलाकडे सध्या केवळ 40 अत्याधुनिक मिग 29 विमाने आहेत. ही विमाने रशियाकडून 2009 च्या करारानुसार घेण्यात आलेली आहेत ही विमाने भारताच्या दोन विमानवाहू नौकांवरुन कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. भारताकडे सध्या रशियाकडून घेतलेली आयएनएस विक्रमादित्य आणि स्वदेशनिर्मित आयएनएस विक्रांत अशा दोन विमानवाहू नौका आहेत.
स्वदेशी विमानांसाठी प्रयत्न
विमानवाहू नौकांवरुन कार्यान्वित होऊ शकतील अशी विमाने स्वबळावर निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तथापि, अशा विमानांच्या निर्मितीला एक दशकाचा कालावधी लागू शकतो. तथापि, तोपर्यंत थांबता येणार नसल्याने नौदलाने 26 राफेल विमानांचा आग्रह धरला होता. भारत सरकारनेही नौदलाची आवश्यकता पाहता ही विमाने घेण्यास संमती दिल्याने विमान खरेदीचा करार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील.
नौदलाची अपेक्षापूर्ती
ड अत्याधुनिक युद्ध विमानांची भारतीय नौदलाची मागणी पूर्ण होणार
ड या 26 विमानांवर अत्याधुनिक शस्त्रसंभार, सिम्युलेटर्स, गन, अस्त्रे
ड येत्या 37 ते 65 महिन्यांमध्ये सर्व विमाने भारताला दिली जाणार