परभणी : मानवत तालुक्यातील मंगरुळ (बु.) येथील श्री नृसिंह शिक्षण प्रतिष्ठान संचालित श्री नृसिंह प्राथमिक शाळेतील शिक्षक सोपान उत्तमराव पालवे यांनी संस्थेच्या सचिवांनी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करीत गुरुवारी (ता.१७) सकाळी पेडगाव शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली.
परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात गुरुवारी सकाळी एका झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत पालवे यांचा मृतदेह आढळून आला. शिक्षक पालवे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या एका पत्रातून श्री नृसिंह शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव बळवंत खळीकर यांना आत्महत्येस जबाबदार धरले. आपण चार वर्षांपूर्वी २० लाख रुपये नोकरीसाठी नगदी दिले. त्यावेळी ४० टक्के अनुदान पदावर घेतो, असे ते म्हणाले होते.
हे पैसे देण्याकरिता आपण स्वतःचे शेत विकले. नातेवाइकांकडून उधार-उसनवारीने पैसे आणले व ते सर्व पैसे खळीकर यांना दिले. परंतु, या संस्थेने बनावट संच मान्यता व इतर बनावट कागदपत्रे सादर करून २०१८-१९ च्या संच मान्यतेनुसार २० टक्के शालार्थ प्राप्त करीत वेतन चालू केले, असा आरोप पालवे यांनी सुसाइड नोटमध्ये केला.
संस्थेने केलेली ही शिक्षक भरती बोगस आहे. त्याबाबत आपण विचारणा केली असता खळीकर यांनी आपणास संस्थेतून काढून टाकण्याची धमकी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक व व्यवस्थापकामार्फत विविध प्रकारे दबाव आणला, असे नमूद करीत संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण व सचिव बळवंत खळीकर हे शाळा भेटीस आल्यानंतर आपणास खळीकर यांनी बोलावून सचिवांच्या लेटर पॅडवर राजीनामा द्यावयाच्या सूचना दिल्या, तसेच तुझे पैसेही परत देणार नाही, असेही ठणकावल्याचे पालवे यांनी या पत्रातून नमूद केले.
आपण साधारण कुटुंबातील आहोत, या फसवणुकीच्या विरोधात लढण्याचे सामर्थ्य आपणास नाही, त्यामुळे आपण कुठलाही पर्याय नसल्याने आत्महत्या करत आहोत, आपल्या पश्चात संस्थेच्या सचिवांना मृत्यूबद्दल जबाबदार धरावे व कुटुंबीयांना संपूर्ण रक्कम व्याजासह द्यावी, अशी अपेक्षा पालवे यांनी या पत्रातून व्यक्त केली. याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.