मनसे-ठाकरे गटात युती? मग महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? संजय राऊत म्हणाले…
GH News April 19, 2025 06:09 PM

Sanjay Raut on Alliance with MNS : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आमच्यातली भांडणं छोटी आहेत, असे सांगत उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) भविष्यात एकत्र येऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या या अप्रत्यक्ष प्रस्तावानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील चर्चेची दारं खुलं आहेत, असे संकेत दिले आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. सोबत त्यांनी महाविकास आघाडीचे भविष्यात काय होणार? याबाबत सूचक विधान केलंय.

महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, राऊत म्हणाले…

संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी राज ठाकरेंसोबत युती झाल्यास तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना “तो पुढचा प्रश्न आहे. त्यावर आम्ही बोलणार नाही. महाविकास आघाडी ही आमची महाराष्ट्रासाठीची एक राजकीय व्यवस्था. राज ठाकरे हे भाजप आणि एसंशिसोबत दिसत आहेत. आमच्यासाठी ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीयेत. ते राज ठाकरे यांचा वापर करून मराठी माणसाला पडद्याआडून त्रास द्यायचं काम करत चालू आहे,” अशी भूमिका संजय राऊत यांनी स्पष्ट केली.

आम्ही वाट पाहू, राज ठाकरे यांच्याकडून…

तसेच मी उद्धव ठाकरेंशी सकाळी आणि रात्रीही चर्चा केली. राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या याविषयावर मी त्यांच्याशी बोललो. आम्ही हवेत बोलत नाही. ही मुंबई आणि मराठी माणूस त्याचा व्यवसाय आणि व्यवहारावर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल. आम्ही वाट पाहू. राज ठाकरे यांच्याकडून चांगली भूमिका आली असेल तर ती नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही,” असे म्हणत आम्ही मनसेसोबत युती करण्यास तयार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. आमच्यातील भांडणं ही क्षुल्लक आहेत. महाराष्ट्र हा फार मोठा आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं. तर आम्हीही युती करायला, चर्चा करायला तयार आहोत, असे सांगितले. त्यासोबतच तुम्ही भाजपा आणि शिंदे गटासोबत जेवायला बसणार नाही, त्यांना पाठिंबा देणार नाही, अशी शपथ घ्या, अशी अटही उद्धव ठाकरेंनी ठेवली आहे. त्यामुळे आता भविष्यात हे दोन्ही नेते एकत्र येणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.