सोलापूर : चिंचोली एमआयडीसी १०२८ हेक्टरवर विस्तारली असून त्याठिकाणी सध्या एक हजारापर्यंत छोटे-मोठे उद्योग आहेत. एमआयडीसीतील उद्योगांसाठी दररोज १५ ते १७ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. पण सध्या महापालिकेकडून १२ एमएलडी पाणी मिळते. समांतर जलवाहिनी झाल्यावर वाढीव मागणी पूर्ण होणार आहे. पण, कच्चे पाणी देण्याची भूमिका महापालिकेने घेतली असून उद्योजकांनी पाकणी जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी मागितले आहे. हा तिढा उद्योग खात्याकडून सुटेल, अशी आशा उद्योजकांना आहे.
चिंचोली एमआयडीसीतील उद्योगांची संख्या सर्वाधिक असून त्यांना महापालिकेकडून पाकणी जलशुद्धीकरण केंद्रावरून दररोज १० एमएलडी पाणी मिळत होते. उद्योजकांच्या वाढीव मागणीनंतर आता १२ एमएलडी पाणी मिळते. पूर्वी नऊ रुपये प्रतियुनिट (१००० लिटर) दराने मिळणारे पाणी आता २३ रुपये दराने दिले जात आहे. २००९-१० पासून पाण्याचा दर प्रतियुनिट नऊ रुपयेच होता, त्यात आता वाढ केली आहे.
वाढीव दरानुसार महापालिकेला बिल देता यावे म्हणून एमआयडीसीने त्यासंबंधीचा प्रस्ताव उद्योग सचिवांना पाठविला आहे. एमआयडीसीकडे स्वतःचा वॉटर ट्रीटमेंट प्लांन्ट आहे, पण तो अनेक वर्षांपासून बंद आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे दोन कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यावर १५ ते १७ एमएलडी पाणी महापालिकेनेच शुद्ध करून द्यावे, अशी मागणी आहे. त्यासाठी एमआयडीसी व महापालिकेचा नवा करार होणार आहे.
उद्योजकांना महापालिकेकडून मिळेल वाढीव पाणी
चिंचोली ‘एमआयडीसी’त उद्योग वाढले असून भविष्यात आणखी वाढतील. त्यामुळे उद्योजकांना वीज व पाणी मुबलक उपलब्ध असावे, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने उद्योग विभागाच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. महापालिकेकडून वाढीव पाणी निश्चितपणे मिळेल, असा विश्वास आहे.
- राम रेड्डी, अध्यक्ष, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन (चिंचोली), सोलापूर
------------------------------------------------------------------------------------------------------
समांतर जलवाहिनी झाल्यावर होईल नवा करार
सध्या चिंचोली ‘एमआयडीसी’साठी १२ एमएलडी पाणी दिले जात असून ‘एमआयडीसी’ असोसिएशनने केली आहे. समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्यावर महापालिका आयुक्त त्यासंबंधीचा नवीन करार करतील. त्यानंतर त्या कराराप्रमाणे कच्चे पाणी की प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी द्यायचे हे ठरेल.
- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य, सोलापूर महापालिका
चिंचोली एमआयडीसीची सद्यःस्थिती
एकूण जमीन
१०२८.३० हेक्टर
उद्योगांसाठी उपलब्ध जागा
१,१६५
उद्योजकांनी घेतलेल्या जागा
१,०२४
सध्या पाणी मिळते
१२ एमएलडी
समांतर जलवाहिनी ‘या’ ठिकाणी थांबली
सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीसाठी दिलेली मुदत ३० एप्रिल रोजी संपणार आहे. सध्या मोहोळ शहराजवळ ४० मीटर, मोडनिंबजवळ ६० मीटर आणि धरणाजवळ ५४० मीटर काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मुदतीत जलवाहिनी झाल्यानंतर ‘एमआयडीसी’तील उद्योजकांसह सोलापूर शहरवासियांची पाण्याची समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. उन्हाळा संपत आला तरीदेखील समांतर जलवाहिनी अजूनही पूर्ण झालेली नाही. दुसरीकडे पाकणी येथील वन विभागाच्या जागेतील जलशुद्धीकरण केंद्राचाही विषय मार्गी लागलेला नाही, हे विशेष.