पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी दहा लाख रुपये जमा करण्यास सांगितले. मात्र पैसे जमा न करु शकल्यामुळे उपचारांभावी तनिषा सुशांत भिसे या महिलेचा मृत्यू झाला. मृत महिला ही भाजपचे विधान परिषदेतील आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालायविरोधात आंदोलन केले असून आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वार्षिक फक्त 1 रुपये भाड्याने जागा दिली असल्याचा दावा केला आहे. त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख आहे. याच निर्णयात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फक्त 1 रुपया भाडे घेऊन सरकारने रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली होती, असा आरोप केला आहे.
मंत्रिमंडळाने 18 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या निर्णयांचा एक फोटो सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी नाममात्र 1 रुपये वार्षिक भाडेपट्ट्याने जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. याशिवाय ट्रस्टने कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे, असे सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सांगण्यात आले आहे.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने सरकारकडून अवघ्या एक रुपयात हॉस्पिटलसाठी जमीन घेतली, मात्र रुग्णांकडून दहा लाख रुपये अगाऊ जमा केल्याशिवाय उपचार करण्यास नकार दिल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुती सरकार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर एवढे मेहरबान का? असा सवाल आता दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते विचारत आहेत.
हेही वाचा : Dinananth Hospital : प्रसूती जोखमीची असल्याचे रुग्णाला सांगितले होते; डॉ. घैसास यांचा दावा