भोसरी, ता. १२ : ‘‘नव्या क्रांतीची बीजे विचारात असतात आणि विचाराची बीजे शिक्षणात असतात. त्यामुळेच महिलांना आणि अस्पृश्यांना शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुरू मानतात. डॉ.आंबेडकर हे विविध ६४ विषयांत पारंगत होते; तर त्यांना नऊ भाषा येत होत्या आणि ३२ पदव्या मिळविणारे एकमेव महामानव होते.’’, असे प्रतिपादन व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीद्वारे भोसरी येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात फुले - शाहू - आंबेडकर ३४ व्या व्याख्यानमालेतील ‘फुले - शाहू - आंबेडकर विचार’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक विजय फुगे आणि संतोष लोंढे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक सखाराम डोळस, जालिंदर शिंदे, सागर गवळी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सम्राट फुगे, सुनील खरात, हेमंत फुगे, स्वप्नील लांडगे, विनय लांडगे आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेतन भालेराव होते.
पुस्तकाचे महत्त्व सांगताना बानगुडे पाटील म्हणाले, ‘‘पुस्तकाने मस्तक कुणाचे हस्तक होत नाही आणि कोणापुढे नतमस्तकही होत नाही. हे डॉ. आंबेडकरांचे चरित्र्य पाहिल्यावर कळते. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. आंबेडकर यांना कृष्णा अर्जुन केळुस्कर यांनी तथागत गौतम बुद्धांचे चरित्र भेट दिले होते. त्या पुस्तकामुळेच क्रांती करू शकल्याचे डॉ. आंबेडकर सांगत असत. त्यांच्याकडे ५० हजार पुस्तकांचे ग्रंथालय होते.’’
महात्मा फुले हे गुरुस्थानी असल्याने डॉ. आंबेडकर आपल्या पत्राची सुरुवात ‘जय शिवराय’ ने करत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कुशल स्वराज्याचा कारभार समोर असल्यामुळे देशाची राज्य घटना तयार करताना काहीही अडचणी आली नसल्याचे डॉ. आंबेडकर हे नम्रपणे सांगत असेही बानगुडे पाटील यांनी नमूद केले. किरण डोळस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.