Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marathi Update: नमन धीरच्या आक्रमक खेळीला सूर्यकुमार यादवची मिळालेली साथ, मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये विजयाची चव चाखता येईल असे वाटले होते, परंतु लखनऊ सुपर जायंट्सने २०३ धावांचा यशस्वी बचाव केला. लखनऊने IPL 2025 मध्ये दुसऱ्या विजयाची नोंद करताना Point Table मध्ये आगेकूच केली. लखनऊ ४ गुणांसह सहाव्या क्रमांकावर सरकले आहेत, तर मुंबई सातव्या क्रमांकावर आहे.
हार्दिक पांड्याने ( ४-०-३६-५ ) पाच विकेट्स घेऊन लखनऊला मोठी धावसंख्या उभ्या करण्यापासून रोखेल. डावात पाच विकेट्स घेणारा तो आयपीएल इतिहासातील पहिलाच कर्णधार ठरला. मिचेल मार्श ( ६०) याने वादळी खेळी केली, तर एडन मार्करमनेही ५३ धावा चोपल्या. निकोलस पूरन( १२), रिषभ पंत ( २) आज अपयशी ठरले. आयुष बदोनीने ३० धावांची उपयुक्त खेळी केली. डेव्हिड मिलरनेही २७ धावांची खेळी केली. लखनऊने ८ बाद २०३ धावा उभ्या केल्या.
आकाश दीप व शार्दूल ठाकूर यांनी अनुक्रमे विल जॅक्स ( ५) व रायन रिकेल्टन ( १०) या सलामीवीरांना १७ धावांवर माघारी पाठवले. नमन धीर व सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला आणि दोघांनी ३५ चेंडूंत ६९ धावा जोडल्या. दिग्वेश राठीने ही भागीदारी तोडली. नमन धीर २४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला.
सूर्यकुमार यादवने सुरेख फटकेबाजी केली आणि लक्ष्याचा पाठलाग करताना त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. मुंबईला विजयासाठी २३ चेंडूंत ५२ धावा हव्या असताना सूर्या बाद झाला. आवेश खानने चतुराईने चेंडू टाकून सूर्याला बाद केले. त्याने ४३ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारांसह ६७ धावा केल्या.
तिलक वर्मा व हार्दिक पांड्या यांना विजयासाठी १८ चेंडूंत ४० धावा करायच्या होत्या. दिग्वेशच्या १८व्या षटकात दोघांनी ११ धावा चोपल्या. लखनऊच्या क्षेत्ररक्षकांचा ढिसाळ कारभार इथेही पाहायला मिळाला. १२ चेंडूंत २९ धावा आता मुंबईला हव्या होत्या. तिलकने स्वतःला रिटायर्ट हर्ट केले आणि २५ धावांवर तो माघारी परतला. शेवटच्या षटकात मुंबईला २२ धावा करायच्या होत्या. हार्दिकने पहिलाच फुलटॉस चेंडू षटकार खेचला. पण, तरीही मुंबईला १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. हार्दिक १६ चेंडूंत २८ धावांवर नाबाद राहिला. तिलक रिटायर्ट हर्ट का झाला हा निर्णय समजण्या पलीकडचा होता.