स्व-प्रेरणेसाठी आंतरिक संवाद
esakal April 05, 2025 01:45 PM

शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

आपली दिनचर्या, आपले विचार, आणि आपली मानसःस्थिती, आपल्या प्रत्त्येकाच्या कार्यक्षमतेला प्रभावित करत असते. आपण प्रत्येक जण आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या कार्यांमध्ये व्यस्त असतो. मग तुम्ही एक विद्यार्थी असाल, एक प्रोफेशनल असाल, एक गृहिणी असाल, एक आई असाल. काही दिवस असे असतात, जेव्हा आपण उत्साह, आत्मविश्वासाने, प्रसन्न मानाने सगळी कामे करतो, तर काही दिवस असतात जेव्हा आपण शंका, भीती आणि द्विधामनस्थितीमुळे थोडे गोंधळतो, तर काही दिवस असेही असतात जेव्हा काहीच करू नये असेही वाटत असते. हे आपल्या प्रत्येकाबरोबर अधूनमधून घडत असते. हे कधीतरी घडते, तेव्हा त्याने आपल्याला फारसा फरक पडत नाही; पण हे सातत्याने घडायला लागले, तर याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होतो.

कधीतरी कंटाळा येणे, थोडा थकवा येणे यात अनैसर्गिक असे काही नाही. आपल्या प्रत्येकाला थोड्या down time ची गरज असतेच. कधीतरी निराश वाटणे हे नैसर्गिक आहे; पण त्यातून नैराश्य येत असेल, demotivated वाटत असेल, तर तेव्हा त्या भावनेमधून स्वतःला बाहेर काढण्यासाठीच्या काही ट्रिक्स आणि टिप्सदेखील आपल्याला शिकल्या पाहिजेत. सेल्फ-मोटिवेशन म्हणजे स्व-प्रेरणेसाठीचा एक उपाय म्हणजे, तुमच्या दिनचर्येत mindful affirmations चा समावेश करणे. अलीकडेच, मी स्वतः अशा अफर्मेशन्सचा समावेश माझ्या दिनचर्येमध्ये केला, आणि हळूहळू मलाही त्याचे फायदे स्पष्ट दिसू लागले.

अफर्मेशन्स म्हणजे स्वतः स्वतःशी केलेला संवाद. स्वतःला दिलेले काही संदेश. हे संदेश म्हणजे अगदी छोटी प्रेरणा देणारी वाक्यं असू शकतात, विचार असू शकतात, उदाहरणार्थ, ‘मी एक सक्षम आणि आनंदी व्यक्ती आहे’, ‘मी एक प्रयत्नशील व्यक्ती आहे’.

अफर्मेशन्स हा आपल्या मनाशी साधलेला आंतरिक संवाद असतो. या आंतरिक संवादाची जी ऊर्जा असते, ती आपल्या विचारांना, भावनांना आणि आपल्या कृतीला प्रभावित करत असते. ही ऊर्जा जेव्हा शंका, भीती, नैराश्य, द्विधा मनस्थितीमधून निर्माण होते, तेव्हा ती ऊर्जा आपल्याला ड्रेन करत असते; पण हीच ऊर्जा जेव्हा, उत्साह, आत्मविश्वास, प्रसन्नता यांमधून निर्माण होते, तेव्हा आपण गतिमान आणि कार्यशील असतो. आणि अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक आंतरिक संवाद आपल्याला सकारात्मक ऊर्जेबरोबर कनेक्ट करतात.

मग रोज एक कुठलीतरी वेळ ठरवावी, आणि एका ठिकाणी फक्त दोन मिनिटं शांत बसून, डोळे बंद करून अशी अफर्मेशन्स मनातल्या मनात म्हणावीत. सुरुवातीला हे थोडे वेगळे वाटेल, थोडे बालिशही वाटू शकते; पण सातत्याने आपण हे केले, तर काहीच दिवसांत याचा सकारात्मक प्रभाव होताना दिसेल.

मग असे कोणते सकारात्मक आंतरिक संवाद आहेत जे आपल्या सगळ्यांनाच उपयुक्त ठरू शकतात, आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात? आणि स्व-प्रेरणेसाठी उपयुक्त ठरू शकतात, ते आज बघुयात.

‘माझे सकारात्मक विचार माझे हितचिंतक आहेत.’

हे वाक्य आपल्याला आठवण करून देते, की सकारात्मक विचार हे कोणत्याही मानसिक परिस्थितीवर, समस्येवर मात करण्यासाठीची पहिली पायरी आहेत. सकारात्मक विचार असणे म्हणजे समस्या नाकारणे नव्हे, तर समस्या सोडवण्यासाठी कायम एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, असा याचा अर्थ होतो. आणि हे वाक्य आपल्याला याची आठवण करून देते.

‘मी सक्षम आणि सामर्थ्यवान आहे.’

हे वाक्य, पुष्टीकरण आपल्याला आपल्यातील मूळ क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्यास मदतगार ठरते. आपल्याला आठवण करून देते, की आपण कोणत्याही परिस्थितीत असलो, तरी आपले गुण आणि आपल्या क्षमता कायम आपल्याबरोबर असतात. हे पुष्टीकरण आपल्याला स्वत:च्या कौशल्यांवर अटळ विश्वास ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. द्विधामनस्थिती, गोंधळ, निराशा अशा भावनांमध्ये न गुंतता, आपल्याला कृती करण्यास प्रोत्साहित करते.

‘माझे अनुभव मला अधिक सक्षम बनवतात.’

हे वाक्य, पुष्टीकरण आपल्याला आजपर्यंत आलेल्या अनुभवांमधून आपण काय शिकलो याची आठवण करून देते, आपल्यातील क्षमतेची आठवण करून देते, आणि आपल्यातला स्वाभिमान जागृत ठेवण्यास मदत करते.

‘मी यशासाठी पात्र आहे.’

बऱ्याच वेळेला आपण आपल्या कौशल्यावर शंका घेतो, ज्यामुळे आपला आत्मविश्वास, आणि मनोधैर्य थोडे कमी झाल्याची जाणीव होते. अशावेळेला हे वाक्य, पुष्टीकरण स्वतःबद्दलच्या शंकांचे निराकरण करण्यास खूप महत्त्वाचे ठरू शकते.

‘मी त्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करेन- ज्या माझ्या नियंत्रणात आहेत.’

हे पुष्टीकरण आपल्याला कायम हे लक्षात ठेवण्यास मदत करते, की आपण फक्त त्या गोष्टींवर फोकस करावा ज्यावर आपले नियंत्रण आहे. यामुळे चिंता आणि काळजी अशा दोन्ही प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यास मदत होते.

अफर्मेशन म्हणजे आपल्या अंतर्मनात पेरलेले सकारात्मक ऊर्जेचे बीज. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात फक्त दोन मिनिटं सातत्यानं अफर्मेशन्सचा समावेश केला, तर तुम्हालाही याचे फायदे नक्कीच दिसतील. मग पुढच्या वेळी तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता वाटेल, तेव्हा एक दीर्घ श्वास घेऊन, या अफर्मेशन्समधून स्वतःला परत एकदा मोटिवेट करा आणि स्वतःवरचा विश्वास बळकट करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.