बीड : घरची परिस्थित बेताची. वडील कारखान्यावर हमाल तर आई दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करून गुजराण करते. आपल्या पालकांचा चाललेला अविरत संघर्ष पाहून पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी गावच्या राजेश निर्मळने अभ्यासासह मैदानी कसरतींवर भर दिला.
यातून त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महसूल सहायक आणि पोलिस निरिक्षक पदाच्या परिक्षेत उत्तीर्ण होत पालकांच्या कष्टाचे चीज केले. जेव्हा त्याने वडीलांना निकाल फोनवर निकाल कळवला तेव्हा ते कारखान्यात साखरेचे पोते उचलत होते. एका क्षणात त्यांच्या पाठीवरचे तीन दशकांपासूनचे ओझे उतरले.
कुटुंबात कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या राजेश निर्मळचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे ग्रामीण भागातच झाले. यानंतर उच्च शिक्षणासाठी त्याने केएसके महाविद्यालयात प्रवेश घेऊन बीए राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली. पदवीदरम्यान आपल्यासह राहणाऱ्या एका मित्राची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर राजेशने देखील लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू करण्याचे ठरवले.
परंतु, घरची परिस्थिती बेताची असल्याने आपण नोकरी करून वडिलांना हातभार लावावा, हा विचार त्यांच्या मनात होता. राजेशची जिद्द आणि मेहनत पाहून वडील ईश्वर निर्मळ, आई सुरेखा निर्मळ आणि भाऊ प्रकाशने त्याच्या स्वप्नांना पाठबळ देत त्याला प्रोत्साहन दिले. घरच्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आणि त्यांच्या कष्टाची जाण ठेवत राजेशने अभ्यास सुरू केला.
आर्थिक स्थिती बेताची असल्याने क्लासेस लावणे शक्य नसल्याने स्वयं-अध्ययनावर भर दिला. २०२१ मध्ये राजेशने पहिल्यांदा पोलिस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा दिली परंतु या परीक्षे मध्ये अगदी पाच गुणांनी त्यांची संधी हुकली हाती आलेल्या अपयशातून शिकत पुन्हा एकदा जोमाने अभ्यास सुरू केला. २०२३ मध्ये राजेशने महसूल सहायक आणि पोलिस उपनिरीक्षक अशा दोन परीक्षा दिल्या. या दोन्ही परीक्षेत राजेशने यश मिळविले.
वडिलांच्या डोळ्यांत पाणीराजेशचे वडील ईश्वर निर्मळ अशिक्षित असून ३० वर्षांपासून साखर कारखान्यात हमाली करतात. मध्यंतरी त्यांनी तीन वर्ष उस तोडण्याचे काम देखील त्यांनी केले. शिक्षणाचा गंध नसतानाही लेकराला शिकवण्यासाठी ते आग्रही होते. राजेशचा निकाल आला तेव्हा वडील गेवराई तालुक्यातील गढी फाट्यावरील साखर कारखान्यात पोते उचलत होते. निकाल कळताच त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण त्यासाठी आपल्या आयुष्यातला उमेदीचा काळ खर्च करत असतो. त्यामुळे प्रामाणिक कष्ट करून आपल्या चुका टाळणे खूप महत्वाचे आहे. त्यासोबतच आपला मित्रपरिवार देखील आपल्याला दिशादर्शकच असावा. ज्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळू शकते.
— राजेश निर्मळ,
एमपीएससी गुणवंत.