PM Kisan,नमो शेतकरी योजनेतून दरवर्षी 6000 खात्यात, राज्यातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले?
Marathi April 05, 2025 11:24 PM

मुंबई : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून एका वर्षामध्ये 6000 रुपये दिले जातात. 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.  केंद्र सरकारच्या या योजनेची अंमलबजावणी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून केली जाते. शेतकऱ्यांना या योजनेच्या 19 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारनं देखील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा 2023-24 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारनं केली होती. तेव्हापासून या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरु करण्यात आलं आहे.

पीएम किसानचे किती पैसे मिळाले?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी फेब्रुवारी-मार्च 2019 पासून करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत.  जो शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पहिल्या हप्त्यापासून लाभार्थी असेल त्याच्या खात्यात 19  हप्त्यांचे प्रत्येकी 2000 रुपये या प्रमाणं 38000 रुपये जमा झाले आहेत. पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याची रक्कम बिहारमध्ये कार्यक्रम घेत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली  होती. तर, 18 व्या हप्त्याची रक्कम महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले होते. आता, देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे किती पैसे मिळाले?

महाराष्ट्रसान्ना एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना 2023-24 अर्थसंकल्प जाहीर करताना केंद्र सरकारच्या पीएम किसान प्रमाणं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहा हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे 2000 रुपये 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या पीएम किसानचे 38000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे  12000 म्हणजे एकूण 50000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता कधी मिळणार?

केंद्र सरकारच्या नियमानुसार चार महिन्यांच्या कालावधीनंतर पीएम किसानचा हप्ता दिला जातो. आता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये देण्यात आले होते. आता पीएम किसानच्या  20 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना जून महिन्यात मिळू शकतात, असा अंदाज आहे.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.