भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं; कर्मचार्‍यावर प्राणघातक हल्ला, अंबरनाथ हादरलं!
Marathi April 06, 2025 03:24 PM

अंबरनाथ क्राइम न्यूज: अंबरनाथच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला (Crime News) केला असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी (5 एप्रिल) रात्री हातात तलवारी घेऊन हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये ऑफिसचं मोठं नुकसान झालं असून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. तर या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

अवघ्या 23 सेकंदात हल्ला चढवून हल्लेखोर पसार

पुढे आलेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचं अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले 10 ते 12 हल्लेखोर आले. त्यांनी ऑफिसच्या काचा तलवारीने फोडत ऑफिसमध्ये घुसून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणावर देखील तलवारीने हल्ला चढवला. तसंच ऑफिसमधील खुर्च्यांचीही तलवारीने वार करत नासधूस केली.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. अवघ्या 23 सेकंदात हल्ला चढवून हे हल्लेखोर तिथून पसार झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेने अंबरनाथ शहराच्या राजकीय वर्तुळात एक खळबळ उडाली आहे.

सर्रासपणे मोठ्या प्रमाणात ड्रॅगची विक्री, महिला आणि मुलांच्या समावेश

मुंबईच्या बांद्रा पश्चिम परिसरात भर दिवसा रस्त्यावर बसून महिलेकडून गांजा विकला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  तर दुसरा व्हिडिओ मालाड मालवणी परिसरात एका गल्लीमध्ये हातात पिशवी घेऊन बिंदास गांजा विकला जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अमली पदार्थ विरोधात मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असताना भर दिवसा बिंदास मुंबई शहरात गांजा विकला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचा कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.  मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकल्या जात असल्याचे नागरिकांकडून तक्रार केल्यानंतर देखील अमली पदार्थ विकणारे व्यक्तींमध्ये मुंबई पोलिसांच्या भीती संपली आहे का? असा प्रश्न देखील नागरिकांकडून विचारला जात आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.