भूषण ओक - शेअर बाजार विश्लेषक
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातशुल्कविषयक धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या साच्यात मोठे बदल घडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे जगभरातील शेअर बाजार ढासळत आहेत. भारतीय सॉफ्टवेअर सेवांना आयातशुल्क लागू नसले, तरी अमेरिकेत येऊ शकणाऱ्या मंदीच्या भीतीने आयटी कंपन्याही पडत आहेत. मात्र, यातून उत्तम गुंतवणुकीसाठी संधी निर्माण होतील. अशी संधी केसॉल्व्हज इंडिया लि. या कंपनीमध्ये मिळू शकते.
कंपनीचा व्यवसायकेसॉल्व्हज इंडिया लि. ही भारतातील एक सॉफ्टवेअर सेवा आणि उत्पादन कंपनी आहे, जी स्थावर मालमत्ता, ई-कॉमर्स, वित्त, दूरसंचार आणि वैद्यकीय सेवांसह विविध क्षेत्रांमध्ये आयटी सेवा पुरवते. २०१४ मध्ये स्थापन झालेली आणि सुमारे ५०० कर्मचारी असलेल्या या कंपनीचे मुख्यालय नोएडा येथे आहे. ही कंपनी जुलै २०२० मध्ये ‘एनएसई एसएमई’मध्ये आणि नंतर २०२२ मध्ये ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’मध्ये अधिकृतरीत्या नोंदणीकृत झाली. ही कंपनी सेल्सफोर्स, मशीन लर्निंग, जावा स्क्रिप्ट आणि पेनिट्रेशन टेस्टिंगसारख्या सॉफ्टवेअर सेवा पुरवते आणि ओडू अॅप्स, मॅजेन्टो अॅप्स, सेल्सफोर्स अॅप आणि इतर अॅपच्या विकासासाठी मदत करते. कंपनीचा मोठा डेटा विभाग अपाचे निफी, स्पार्क, काफ्का आणि कॅसांड्रासारख्या सेवा प्रदान करतो. सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील ही एक अगदी छोटी; पण वेगाने वाढणारी कंपनी आहे. कंपनीच्या अलीकडील सेवांमध्ये यूएईच्या एका मोठ्या बँकेकडून दुसऱ्या बिग डेटा प्रकल्पाची नवी ऑर्डर, दुबईच्या सर्वांत मोठ्या ड्रायव्हिंग स्कूलशी व्यावसायिक संबंध आणि अमेरिकेतील एका शिपिंग कंपनीसोबत आणखी दोन करार यांचा समावेश आहे.
आर्थिक आकडेवारीही एक केवळ १०६० कोटी बाजारमूल्य असलेली एक छोटी सॉफ्टवेअर कंपनी आहे. कंपनीची विक्री आणि निव्वळ नफा गेल्या तीन वर्षांमध्ये ५७ टक्के आणि ५६ टक्के चक्रवाढ दराने वाढले आहेत. हे आकडे प्रचंड वेगाने होणारी वाढ दर्शवितात. कंपनीचे कर्ज नगण्य आहे आणि या वर्षीचा आरओसीई २०१ टक्के म्हणजे अविश्वसनीय आहे. कंपनीचे खेळत्या भांडवलाचे नियोजन उत्तम आहे. कंपनीचा ताळेबंद केवळ ५७ कोटी रुपयांचा आहे. कंपनीची रोकड आवक कार्यचालन नफ्याच्या तुलनेत उत्तम आहे. लाभांशाचा परतावा (सध्याच्या किमतीवर) ३.५ टक्के आहे. ही कंपनी वेगवान वाढीच्या अगदी पहिल्या टप्प्यात आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये वाढीचा वेग मंदावेल आणि आर्थिक आकडेही इतके छान दिसणार नाहीत परंतु, व्यवसायवाढ आणि नफावाढ सध्यापेक्षा अर्धी राखू शकली, तरी या कंपनीतील गुंतवणूक उत्तम परतावा देऊन जाईल व भविष्यात ही कंपनी मायक्रोकॅपमधून स्मॉल कॅप आणि मिड कॅपसुद्धा बनू शकते.
मूल्यांकनकंपनीचा शेअर सध्या २७.८ या पीई गुणोत्तराला उपलब्ध आहे, जे ३२.३ या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा बरेच कमी आहे. पीईजी ०.५, ईव्ही ईबिटा गुणोत्तर १९.८ असे इतर आकडे वाजवी आहेत. प्राइस कॅश गुणोत्तर ३१.७ आहे, पिट्रोस्की नंबर सहा म्हणजे ठीक आहे.
निष्कर्षइतर व्यवसायांच्या विपरीत आयटी व्यवसाय हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी समजून घ्यायला खूप कठीण असतो. ही एक मायक्रोकॅप कंपनी असल्याने जोखीम आहेच; पण ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता आहे, त्यांनी या कंपनीचा सद्यःस्थितीत गुंतवणुकीसाठी अवश्य विचार करावा.
(डिस्क्लेमर : हा लेख केवळ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी असून, गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी त्यांच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.)