पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावले आहे. पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमानामध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहरात बुधवारी (ता. ९) ४१ अंश सेल्सिअस तर उपनगर परिसरामध्ये ४२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविले गेले आहे. दुपारी कडक उन्ह आणि रात्री उकाड्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पुणेकर अक्षरशः गरम वाऱ्याच्या झळा सहन करत आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. परिणामी उन्हाच्या झळा आणि रात्रीचा उकाडा कायम राहण्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने दिले आहेत.
पुणे आणि परिसरात गुरुवारी (ता. १०) कमाल तापमानात बदल होणार नसून कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले जाईल. तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
तर शुक्रवारी (ता. ११) कमाल तापमानात किंचित घट होणार असून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदविले जाण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.