Chembur Firing: मुंबईत बंदुकधाऱ्यांचा धुमाकूळ! बिल्डरवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; कारवर केला गोळ्यांचा वर्षाव
esakal April 10, 2025 07:45 AM

Chembur Firing: मुंबईतील चेंबूर भागात एका बिल्डवर गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे. भर चौकात रहदारीच्यावेळी या बिल्डरच्या धावत्या कारवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे, त्याला जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची खबर कळताच गोवंडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या चेंबूर विभागात गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली आहे. बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास चेंबूरमधील डायमंड गार्डन सिग्नल परिसरात हा गोळीबार झाला. दोन व्यक्तींनी दुचाकीवर येऊन सद्रुद्दीन खान (वय ५०, रा. पारसिक हिल, बेलापूर) या नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक अर्थात बिल्डरवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पनवेल हायवेवरुन पनवेलच्या दिशेनं जात असताना हा प्रकार घडला.

दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीला झेन हॉस्पिटलला दाखल केलं आहे, या व्यक्तीचा प्रकृती स्थिर आहे. पण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून गोळीबाराच्या घटनेचा पंचनामा सुरु असून पोलिसांची मोठी गर्दी या रस्त्यावर दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.