इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत बुधवारी (९ एप्रिल) गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ५८ धावांनी पराभवाचा धक्का दिला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात दमदार कामगिरी करत हा विजय मिळवला.
गुजरातचा हा ५ सामन्यांतील चौथा विजय आहे. त्यामुळे त्यांनी आता पाँइंट्स टेबलमध्येही अव्वल क्रमांक मिळवला आहे. मात्र ५ सामन्यांतील हा तिसरा पराभव आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थानसमोर २१८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला १९.२ षटकात सर्वबाद १५९ धावाच करता आल्या. गुजरातकडून गोलंदाजांची सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. तसेच फलंदाजी साई सुदर्शन चमकला. राजस्थानचे १० पैकी ९ फलंदाज झेलबाद झाले.
राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन सलामीला फलंदाजीला उतरले होते. पण दुसऱ्याच षटकात यशस्वी जैस्वालला अर्शद खानने ६ धावांवर माघारी धाडले. पुढच्या षटकात नितीश राणाला मोहम्मद सिराजने कुलवंत खेजरोलियाच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर संजू सॅमसन आणि संजू सॅमसन यांनी डाव पुढे नेला होता.
रियानने आक्रमक खेळण्याचाही प्रयत्न केला. त्यांची ४८ धावांची भागीदारीही झाली. पण ७ व्या षटकात परागला खेजरेलियाने जॉस बटलरच्या हातून झेलबाद केले. परागने १४ चेंडूत २६ धावा केल्या. ध्रुव जुरेलही ५ धावांवरच बाद झाला. पण त्यानंतर शिमरॉन हेटमायर आक्रमक खेळत होता, त्याला सॅमसन साथ देत होता. त्यांच्यातही ४८ धावांची भागीदारी झाली.
ही भागीदारी संजू सॅमसनला प्रसिद्ध कृष्णाने बाद करत तोडली. त्याचा झेल साई किशोरने घेतला. त्यानंतर मात्र शुभम दुबे (१) आणि जोफ्रा आर्चर (४) यांनीही झटपट विकेट गमावल्या. शुभम दुबे राजस्थानचा या डावात पायचीत झाला. त्याला राशिद खानने बाद केले. त्याच्याशिवाय बाकी सर्व फलंदाज झेलबाद झाले.
शिमरॉन हेटमायरने अर्धशतक केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अर्धशतकानंतर त्याला प्रसिद्ध कृष्णानेच बाद केले. हेटमायरने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. त्यानंतर तुषार देशपांडेही ३ धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकात महिश तिक्षणा ५ धावांवर बाद झाला. त्यामुळे राजस्थानचा डाव संपला.
गुजरातकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. राशिद खान आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, अर्दश खान आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद २१७ धावा केल्या. साई सुदर्शनने ५३ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
जॉस बटलरने २५ चेंडूत ३६ धावा केल्या, तर शाहरुख खाननेही २० चेंडूत ३६ धावा केल्या. राहुल तेवातियाने १२ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. राशिद खाननेही ४ चेंडूत १२धावा केल्या.
राजस्थानकडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडे आणि महिश तिक्षणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
गुजरात टायटन्स ४ विजय मिळवणारा या हंगामातील पहिला संघ ठरला. त्यांनी आता ८ गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्याखालोखाल अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स हे संघ प्रत्येकी ६ गुणासंह आहेत.
राजस्थान रॉयल्स सातव्या क्रमांकावर आले आहेत. त्यांचे ४ गुण आहेत. त्यांच्यापुढे ६ व्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सनेही ४ गुण आहेत.
तळातील ८, ९ आणि १० व्या क्रमांकावर अनुक्रमे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद आहेत. या तिन्ही संघांचे प्रत्येकी २ गुण आहेत. नेट रन रेटच्या फरकामुळे क्रमवारीत ठरली आहे.