सोलापूर : मोजणी नसल्याने गुंठेवारी जागांची खरेदी-विक्री होत नाही. ज्यांची जागा आहे त्यांना महापालिका बांधकाम परवाना देत नाही. ही बाब शहरविकासामध्ये बाधा आणणारी आहे. सोलापूरच्या हद्दवाढ भागातील गुंठेवारी मोजणीचा प्रलंबित विषय मार्गी लावून गुंठेवारीचे प्रकरण तत्काळ निकाली काढण्यात यावे, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत.
शहराच्या गुंठेवारी विषयासंदर्भात मुंबईत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूमी अधीक्षक दादासाहेब घोडके व उपभूमी अधीक्षक सावंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
शहराचे १९९२ नंतर हद्ददवाढ झाल्यानंतर शहारालगतचे बसवेश्वरनगर, शिवाजीनगर, प्रतापनगर, दहिटणे, मजरेवाडी, नेहरू नगर, केगाव, कसबे सोलापूर, बाळे, सोरेगाव, कुमठे, देगांव, शेळगी ही गावे सोलापूर महापालिकेत समाविष्ट झाले. जागेची मोजणी नसल्याने गुंठेवारी जागांची खरेदी-विक्री होत नाही आणि जागा असलेल्यांना महापालिका बांधकाम परवाना देत नाही. त्यामुळे गुंठेवारीला परवानगी मिळत नसल्याने अनेकांना नोटरीद्वारे जागा घेऊन घरे बांधावी लागत आहे. या १२ गावातील नागरिकांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. भूमीअभिलेख कार्यालयाकडून महापालिकेचा प्राथमिक लेआउट मागितला जातो.
तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात त्या जागेचा मोजणी नकाशा व मालकीचे मूळ कागदपत्र असल्याशिवाय परवानगी मिळत नाही. यात स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना ही जागा विकता येत नाही किंवा परवानगी घेऊन घर बांधता येत नाही. त्यामुळे शहर हद्दवाढ भागाचा विकास थांबल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांनाकडून सद्यस्थितीची माहिती घेतली आणि हद्दवाढ भागातील गुंठेवारी मोजणीचा प्रलंबित विषय मार्गी लावून प्रस्तावित गुंठेवारीचे प्रकरण तत्काळ निकाली काढण्यात यावे, अशा सक्त सूचना यावेळी केल्या. या बैठकीस ज्ञानेश्वर कारभारी, सोमनाथ रगबले, किरण पवार, ॲड. फुलारी उपस्थित होते.
विशेष शिबिराचे आयोजन
सोलापूर शहरातील प्रस्तावित प्रकरणे आहेत. ज्या नागरिकांना मोजणी आवश्यक आहे, अशांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करावे. यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी संवाद साधून गुंठेवारीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करावे, असेही सूचना महसूलमंत्री बावनकुळे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना केले.