अल्पवयीन गर्दुल्ल्यांचा कामगारावर चाकूहल्ला
उल्हासनगर, ता. १७ (बातमीदार) : अल्पवयीन मुलांमध्ये नशेचे प्रमाण वाढल्याने त्यातून अनेक वादविवादाच्या, हाणामारीच्या घटनांत वाढ होत आहे. त्यातच आता दोन अल्पवयीन गर्दुल्ल्यांनी कारखान्यातील कामगारावर चाकूहल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. १६) रात्री उल्हासनगरात घडली आहे.
कॅम्प नंबर ५ मधील मच्छी मार्केट परिसरात हा गाऊन कारखाना आहे. रात्रीच्या सुमारास कामगार मशीनवर गाऊन तयार करण्याचे काम करत असताना, दोन अल्पवयीन मुले कारखान्यात जबरदस्तीने आली. त्यांनी नशा केलेली होती. या मुलांनी अर्थर अन्सारी या कामगाराकडे फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. अर्थरने चार्जिंग नसल्याचे कारण सांगून मोबाईल देण्यास नकार दिला. तेव्हा या मुलांनी त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या हातावर वार केले.
आपल्या कारखान्यातील कामगारावर चाकूहल्ला झाल्याचे समजताच मालकाने कारखान्यात धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने त्यांच्या हातातील चाकू हिसकावून या दोन्ही मुलांना हिललाइन पोलिस ठाण्याच्या सुपूर्द केले. हिललाइन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे; मात्र चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या कामगाराला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते, पण तो तक्रार देण्यासाठी परत आला नाही. त्याला तक्रार दाखल करण्यासाठी बोलावण्यात येणार असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले.