माझं नाव मगन. मी एक कोंबडा आहे. साधा ब्रॉलयर आहे, गावठी किंवा कडकनाथ वगैरे नव्हे. रविवार असूनही मी हा मजकूर लिहीत आहे. वास्तविक यावेळी मी कुणाच्या तरी घरातल्या चुलीवर शिजलो असतो, पण त्याऐवजी एका शानदार वातानुकुलित मोटारीत मागच्या शीटेवर (पक्षी : सीट! कोंबडा म्हटल्यावर तुम्हाला वेगळीच शीट आठवणार!) रेलून बसून आरामात लिहीत आहे. कोंबड्याला लिहिता येते का, असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. वाटलंच मला! पण एक लक्षात घ्या, मी एका कोट्याधीशाचा लाडका कोंबडा आहे. मला काहीही जमू शकतं.
गेल्या आठवड्यापर्यंत मी एका अस्वच्छ पोल्ट्रीफार्मवर कोंबडीअन्न खात दिवस काढत होतो. माझ्या मालकाने शे-दोनशे कोंबड्या भसाभस उचलून पिंजऱ्याच्या ट्रकात भरल्या, तेव्हाच मी आसपासच्या माझ्या मित्र-मैत्रिणींचा भरल्या गळ्याने निरोप घेतला होता. गळा इतका भरला होता की धड बांगदेखील देता येईना. पोल्ट्री फार्ममध्ये बव्हंशी कोंबड्याच अधिक. आमच्यासारखे कोंबडे तसे कमी! त्यामुळे मला मैत्रिणी फार होत्या, हे वेगळं सांगायला नको. माझे दोन्ही लेगपीस (पक्षी : पाय) उचलून मालकानं मला ट्रकात टाकलं, तेव्हा शेकडो कोंबड्यांना हुंदका आवरला नाही. ‘मगऽऽन’ असा आक्रोश दुमदुमला. मी मात्र मोक्षाच्या विचारांनी विषण्ण होत गेलो. ‘तुम क्या लाये थे, जो तुम खो जाओगे? तुम्हारे पास क्या था, जब तुम इस दुनिया में आये थे?’ माझा अखेरचा प्रवास सुरू झाला…
पण ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट असते, त्याला कोणीही मारु शकत नाही. आमचा कोंबड्यांचा ट्रक भरधाव निघालेला असतानाच समोरुन जामनगरहून एक पदयात्रा येत होती. त्या पदयात्रेच्या आघाडीला साक्षात अनंताचे दर्शन घडले. त्या अनंतकोटी ब्रह्मांडनायकानं आमचा ट्रक थांबवला. ट्रकचालक खाली उतरला. पुढील संवाद आमच्या कुक्कुटकर्णावर पडला तो असा :
‘‘मेरे भाई, यह क्या लेकर जा रहे हो?’ देवदूताचा मंजुळ आणि अक्षरश: लाखमोलाचा प्रश्न.
‘‘देखतो नथी? मरघो छे, मरघो!,’’ ट्रकचालक म्हणाला. मरघो मा कोंबडी.
‘‘अरेरे, या कोंबड्यांचं काय करणार?’’ देवदूत.
‘‘चिकन कबाब, चिकन करी, मुर्ग मखनी, बटर चिकन, मुर्ग मुसल्लम, कोंबडीवडे…बरंच काही करणार, साहेब!’’ ट्रकचालकानं ढाब्यावर उभं असल्यागत मेनू कार्ड वाचून दाखवलंन.
‘‘एक कोंबडी कितना भाव?’’ देवदूतानं शेअरमार्केटात उभं असल्यागत विचारलंन. ट्रकवाल्यानं काहीतरी आकडा फेकला. ‘‘दुगना भाव आपीश! मने मरघो जोईये!,’’ देवदूतानं फायनल फिगर समोर ठेवली. ट्रकचालक मनात म्हणाला, ‘‘बरंय की, डिझल बी वाचतंय, कोंबड्याही इकल्या गेल्या. काही का करंना ह्यो बाब्या! नाहीतरी आईतवारी रामनवमीच येती. कुणी सांगितलाय आतबट्ट्याचा धंदा. दिऊन टाकाव्या कोंबड्या!’’ सगळ्या कोंबड्या सुटल्या! साई सुट्यो!!
अनंतकोटी ब्रह्मांडनायकानं मला हळूवारपणे ट्रकच्या पिंजऱ्यातून जवळ ओढलं. छातीशी धरलं. आईच्यान सांगतो, डोळ्यात पाणी आलं. कोंबडं नुसतंच ओरडत नाही, ते रडतंसुद्धा!
सगळ्या कोंबड्या ‘वनतारा’ला पाठवण्यात आल्या. तिथं प्राण्यांचं फाइवस्टार होम-स्टे आहे. च्यामारी, जो मुर्गी कबाब बनने चली थी, वो शबाब पर आई!
‘वनताऱ्या’ या सर्व मुर्गीजनांना उत्तम परदेशी अन्न, स्वच्छ, मोकळाढाकळा निवास आणि ऐश्वर्यवान साधनसुविधा मिळणार होत्या. मी गहिवरलो. त्या देवदूतानं मला पुन्हा ट्रकात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मी जाम चिकटून बसलो. शेवटी तो म्हणाला, ‘‘लब्बाड, याला मी आता माझ्या गाडीतच ठेवतो!’’
…तर मी आत्ता या आलिशान गाडीत बसलोय. जय द्वारकाधीश!