नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने बैठकांवर बैठका घेत प्रत्यक्षात कुठलीच ठोस कारवाई न करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मात्र रामतीर्थ, शाही मार्ग, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याला अडसर ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी ५० जणांचा ताफा असलेली एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.
त्यासंदर्भात विविध संस्थांकडून देकार मागविले आहेत; परंतु महापालिकेच्या या कृतीविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींसह आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी विरोध दर्शविला असून, सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाचा बाऊ करून वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना त्रास झाल्यास शांत बसणार नाही, असा थेट इशाराच प्रशासनाला दिल्याने सिंहस्थापूर्वी संघर्ष अटळ बनला आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या सात हजार कर्मचारी अधिकाऱ्यांपैकी जवळपास तीन हजार इतके कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यामुळे महापालिकेतील बहुतांश सर्वच विभागांचे कामकाज हे अपुऱ्या मनुष्यबळावरच सुरू आहे. अतिक्रमण विभागामध्ये सध्या ५० इतकेच कर्मचारी आहेत. त्यात वाहनचालक, क्लार्क तसेच बिगारी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता इतक्या कमी मनुष्यबळात शहरात होत असलेले अतिक्रमण हटविणे शक्य नाही.
अतिक्रमणांचा वाढता विस्तार आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी होत असल्याचे निमित्त करून अतिक्रमण विभागाने तीन वर्ष कालावधीसाठी अतिक्रमण विभागासाठी आउटसोर्सिंगने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पंचवटी विभागासाठी ५० मनुष्यबळ आउटसोर्सिंगने मागविण्यासाठी देकार मागविले. अतिक्रमण हटविण्यासाठी मनुष्यबळाबरोबरच ट्रक, जेसीबी, गॅस कटर, वेल्डिंग मशिनचीदेखील मागणी केली आहे.
पंचवटीवर लक्ष केंद्रित
शहरात सहा विभाग असून यातील पंचवटी विभागात विशेष करून रामतीर्थ गोदाघाट, तपोवन, साधुग्राम व परिसरात अतिक्रमण हटविले जाणार आहे. त्यासाठी ५० मनुष्यबळ तर उर्वरित पश्चिम, पूर्व, नाशिकरोड, सिडको व सातपूर विभाग मिळून ११० मनुष्यबळाची मागणी केली आहे.
पंचवटीत वादाची ठिणगी
सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करताना साधू, संतांच्या नाराजीचा सामना प्रशासनाला करावा लागतं आहे. खरे, खोटे आखाडे, महंतांच्या पदव्यांवरून वाद सुरु आहे, तर प्रशासनात परसेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात असल्याने स्थानिक विरुद्ध परसेवेतील अधिकारी असा वाद सुरू आहे. त्यात आता पंचवटीतील अतिक्रमण हटविण्यासाठी बाह्य यंत्रणेचा वापर होणार असल्याने नवा वाद उद्भवला आहे. पंचवटी, रामतीर्थ, शाही मार्ग व काळाराम मंदिर परिसरात वर्षानुवर्षं दुकाने आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने परवानगी दिली असताना आता अडथळे कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाचा बाऊ करून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना त्रास देवू नये. स्थानिक व्यावसायिकांच्या पोटावर पाय दिल्यास शांत बसणार नाही.
- ॲड. राहुल ढिकले, आमदार