मोरगाव, ता. ५ : मुर्टी (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात मेंदूज्वरावर मात करण्यासाठी एकूण उद्दिष्टाच्या ८५ टक्के मुलांना जापनीज इन्सेफे लाइटिस (जेई) लसीकरण केले आहे.
मुर्टी गावाच्या कार्यक्षेत्रात जवळपास एक ते पंधरा वयोगटातील या लसीकरणासाठी २३०० पात्र मुले आहेत. महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र अशा ठिकाणी शिबिर घेऊन आरोग्य विभागाकडून लसीकरण केले. मुर्टी येथे २३०० बालकांमध्ये १९२३ बालकांचे लसीकरण झाले आहे. लाभार्थ्यांमध्ये केवळ ३७७ मुले अद्याप या लसीकरणापासून वंचित आहेत. ज्या मुलांचे लसीकरण झाले नाही, त्या मुलांच्या पालकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करून हे लसीकरण आवर्जून करून घ्यावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रगती कराळे व आरोग्य निरीक्षक प्रदीप होळकर यांनी केले.
आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका अपर्णा ननावरे, जयश्री देसाई, दिप्ती दुर्गाडे, आरोग्य सहाय्यक सुनीता मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी यांनी हे लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन केले.