महाळुंगे पडवळ - विठ्ठलवाडी- टाकेवाडी (ता. आंबेगाव) येथील ठाकर समाजाच्या प्रेमीयुगुलाने हुतात्मा बाबू गेनू सागराच्या (डिंभे धरण) डाव्या कालव्यात उड्या मारल्या आहेत. कविता सुनील पारधी (वय ३६, रा. टाकेवाडी-ठाकरवाडी) व पप्पू लक्ष्मण खंडागळे (वय ३३, रा. जऊळके बुद्रुक-ठाकरवाडी, ता. खेड), अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी (ता. ५) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली.
कविता पारधी या गेली १२ ते १५ वर्षे माहेरी आई संगीता राजू काळे यांच्याकडे राहत होत्या. कविता पारधी आणि पप्पू खंडागळे या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे पारधी कुटुंबातील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
कविता पारधी आणि त्यांची मामाची मुलगी दिव्या राजाराम काळे (वय १३) मांजरवाडी (ता. जुन्नर) व कडूस (ता. खेड) येथे यात्रेला जाण्यासाठी शुक्रवारी (ता. ४) सकाळी घराबाहेर पडल्या होत्या. शनिवारी (ता. ५) पहाटे पप्पू खंडागळे, कविता आणि दिव्या, असे तिघे जण मोटारसायकलवरून (क्र. एमएच १४ डीएस ६३२९) टाकेवाडी येथील ठाकरवाडीकडे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास येत होते.
टाकेवाडी डाव्या कालव्याजवळ आल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर कविता हिने प्रथम कालव्यात उडी टाकली. त्यानंतर पाकीट आणि मोबाईल दिव्याकडे देऊन पप्पू खंडागळे याने कालव्यात उडी टाकली. दोघांनाही पोहोता येत असल्याने ते बाहेर येतील, असे मुलीला वाटले.
परंतु, दोघेही काहीवेळानंतर दिसेनासे झाल्यानंतर मुलगी घाबरून रामदास भीमाजी चिखले यांच्या शेडमध्ये बसली. सकाळी रामदास चिखले यांच्या घराच्या अंगणातील शेडमध्ये आले असता त्यांना तेथे मुलगी दिसली. तिला विचारले असता तीने घडलेला प्रकार सांगितला.
डाव्या कालव्यात शोधमोहीम
पोलिस पाटील उल्हास चिखले, ग्रामस्थ राहुल नंदराम चिखले, उपसरपंच समीर काळे, भानुदास विष्णू चिखले, रवींद्र मोतीलाल काळे, अनिल दगडू जाधव, शांताराम शंकर चिखले, विशाल रामदास चिखले, धनंजय राजू काळे यांनी घटनास्थळापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरात डाव्या कालव्यात शोधमोहीम राबविली.
परंतु, पारधी आणि खंडागळे आढळून आले नाहीत. मंचर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संदीप कारबळ, एस. आर. मांडवे, संजय नाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुकडी पाटबंधारे विभागाला कालव्यातील पाणी कमी करण्याबाबत कळविण्यात आले आहे. कालव्यातील पाणी कमी झाल्यानंतर शोधमोहिमेला गती येईल, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.