राहुल हातोले : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ६ : कोट्यवधी रुपयांच्या करभरणा करूनही पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण संस्थांना अनेक समस्यांना सामोरे जाव लागत आहे. पाणी प्रश्नासह विजेचा खोळंबा, कचऱ्याचे गैरव्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी या मुख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चिखली-मोशी-चऱ्होली, वाकड, पिंपळे सौदागर गृहनिर्माण संस्थांना कन्व्हेअन्स डीड (मालकी हक्काचे अधिकृत हस्तांतरण) आणि डीम्ड कन्व्हेअन्स (मानीव अभिहस्तांतरण) व मिळकत पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) आदी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात अडचणींना सामोर जावे लागत आहे.
शहरातील गृहनिर्माण संस्थांना दिवसाआड आणि तेदेखील अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोर जावे लागत आहे. त्यामुळे रहिवाशांना टॅंकरवर अवलंबून राहावे लागते आहे. नागरिकांच्या अडचणींचा गैरफायदा घेत काही टॅंकरचालक
अव्वाच्या सव्वा दर आकारून सोसायटीधारकांची लूट करत असल्याचा आरोप होत आहे. वाकड, हिंजवडी आयटी पार्क परिसरात कधीही वीज पुरवठा खंडीत होणे, काही भागांतील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी रस्ते अरुंद करून अर्बन स्ट्रीट प्लॅनअंतर्गत पदपथ बनविण्यात आले. याचा फायदा केवळ पथारीवाल्यांना झाला. त्यामुळे नागरिकांचा चालणेदेखील कठीण झाले आहे. सायकल ट्रॅक आणि पदपथावर बेकायदेशीर हॉकर्स झोन उभारण्यात आले आहे. तेथेच आठवडी बाजार भरविले जात असून, उरलेल्या जागेत वाहने पार्क केली जात आहेत. परिणामी, रस्त्याच्या मधोमध चालावे लागत असल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग शोधता-शोधता सोसायटीधारकांच्या नाकीनऊ आले आहेत. तसेच कचरा व्यवस्थापनाचा भार महापालिकेने सोसायटीधारकांच्या माथी मारला आहे. नागरिकांना सुविधा आणि सेवांसाठी जसे पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आदींसाठी महापालिका उपयोगकर्ता शुल्क (युजर फी) आकारते. हा कर भरताना कचरा व्यवस्थापनाचा खर्चही सोसायटीधारकांना भरावा लागत आहे.
तसेच ‘डीम्ड कन्व्हेअन्स’ करण्यास बिल्डर तयार होत नाही. परिणामी, नागरिकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या सोडवण्यासाठी वकिलांची मोठे शुल्क नागरिकांना भरावे लागत आहे. प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना सिटी सर्व्हे कार्यालयात खेटे मारावे लागत असल्याची स्थिती आहे.
सोसायटीधारकांना भेडसावणाऱ्या समस्या :
अपुरे पाणी, वारंवार वीज खंडीत होणे, कचऱ्याचे गैरव्यवस्थापन, वाहतूक कोंडी, पदपथामुळे अरुंद झालेले रस्ते, मिळकत पत्रक, कन्व्हेअन्स डीड, डीम्ड कन्व्हेअन्स इ.
बिल्डरकडून दिला जाणारा एसटीपी प्लॅंट योग्यरित्या बनविलेला नसतो. त्याला महापालिका न पाहताच मंजुरी देत आहे. तो सोसायटीकडे सूपुर्द केल्यावर रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोर जाव लागत आहे. सहकार विभागानेदेखील सोसायाट्यांच्या समस्या जाणून घ्याव्या. विकसकांची बाजू घेऊन सोसायटीधारकांना त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
- दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड फेडरेशन.
पाणी, पदपथ, विजेचा खोळंबा आणि वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कन्व्हेअन्स डीड, डीम्ड कन्व्हेअन्स करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने पुढाकार घेत फेडरेशनच्या माध्यमातून मेळावे घेऊन हा कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून द्यावा.
- उदय साबदे, पिंपळे सौदागर,
महापालिकेने एका बाजूला सूचना केली की, ओला कचरा जिरवला जावा. परंतु सोसायटीकडे जागा नसल्याने बाहेरच्या संस्थांकडे पाठवला जातो. त्यापासून खत बनविण्यात येते. मात्र, त्यासाठी मोठा खर्च सोसायटीला भरावा लागत आहे. महापालिका कर लावते त्यामुळे दोन्हींकडचा आर्थिक भार सोसायट्यांवर पडत आहे. तसेच विजेचा खोळंबा, वाहतूक समस्या आणि भटक्या कुत्र्यांचा होणारा त्रास या मोठ्या समस्या आहेत.
- प्रशांत पाटील, वाकड, पिंपरी चिंचवड गृहनिर्माण संस्था.
विकसकाकडून महापालिकेस सादर केलेल्या बांधकामात वारंवार बदल केला जातो. पार्किंगची समस्या मोठी बनली आहे. बिल्डरने महापालिकेस लिहून दिले की, पाणीपुरवठा केला जाईल. मात्र, तो बिल्डरद्वारे केला जात नाही. सोसायटी हस्तांतरण करताना कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली पिं. चिं. गृहनिर्माण संस्था.
पिंपरी चिंचवड गृहनिर्माण संस्था.