मुंबई: मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक असतानाच आज महायुतीचे मंत्री, शिवसेना शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. मराठी भाषिकावरील अन्यायाबाबत राज ठाकरेंशी चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. बाकीच्या भाषेचा सन्मान आम्ही करतो, तसा आपल्या भाषेचादेखील व्हावा, ही राज ठाकरेंची भूमिका आहे आणि आमचीदेखील तीच भूमिका असल्याचे उदय सामंत म्हणाले.
मराठीबाबत कोणी उलटसुलट केले तर काय करायचं हे बैठकीत ठरवू, असे उदय सामंत यांनी नमूद केले. महाराष्ट्रात मराठीसंदर्भात ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यासंदर्भात बोलण्यासाठी, मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी येथे आलो. महाराष्ट्रात ज्या बँका, संस्थांत मराठीबाबत चालढकल करतात, त्याचा प्रतिबंध कसा करायचा यांसदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेन. त्यात काय सुधारणा करण्यात येतील, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे उदय सामंत म्हणाले.
बाकीच्या भाषांचा सन्मान आम्ही करतो, तसा आपल्या भाषेचादेखील व्हावा, ही राज ठाकरेंची आणि आमचीदेखील भूमिका आहे. भाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. राज्यातील सर्व बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजेत, यासाठी सर्व समित्यांची बैठक घेईन आणि काय कार्यवाही करता येईल याबाबत निर्णय घेऊ, असे सामंत यांनी नमूद केले.
बालिश म्हटले म्हणून कोणी बालिश होत नाही. बालिश लोकांना मी उत्तर देत नाही, असे सांगत सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेंवर टीका केली होती. त्याला सामंत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. लोकसभेतील श्रीकांत शिंदे यांचं भाषण त्यांनी बघितलेलं नसावं, सात-आठ टर्मचा खासदार ज्या पद्धतीने सभागृहात भाषण करतो, असं भाषण डॉ. श्रीकांत शिंदेंनी केल्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला आहे, असा टोला सामंत यांनी लगावला.