इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १७ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. चेपॉकला झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २५ धावांनी विजय मिळवला. मात्र हा चेन्नईचा सलग तिसरा पराभव ठरला.
दरम्यान, चेन्नईच्या पराभवासोबतच या सामन्यादरम्यान चेन्नईचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनीच्या निवृत्तीचीही चर्चा रंगली. त्यामागे काही कारणंही आहेत.
या सामन्यासाठी संपूर्ण कुटुंब चेपॉक स्टेडियमवर हजर होते. यापूर्वी कधीही धोनीच्या सामन्यासाठी त्याचे आई-वडील एकत्र स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे कधी पाहण्यात आले नव्हते. पण या सामन्यासाठी धोनीचे आई-बाबा, त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा हे सर्वच स्टेडियममध्ये हजर होते. त्यांनी सामना पाहण्याचा आनंदही घेतला.
दरम्यान, साक्षी आणि झिवा या दरवर्षीच चेन्नई सुपर किंग्सला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये दिसतात. मात्र, यावेळी पहिल्यांदाच धोनीचे आई-बाबाही स्टेडियममध्ये दिसल्याने धोनी या सामन्यानंतर निवृत्ती घेणार का, अशा चर्चा सुरू आहेत.
त्यातच त्याची पत्नी साक्षी हिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये साक्षी काहीतरी बोलताना दिसत आहे. तिच्या शेजारी झिवाही आहे.
साक्षी काय बोलत आहे, हे ऐकू येत नसले, तरी तिच्या ओठांच्या हालचालींवरून तरी ती 'लास्ट मॅच' असं काहीसं बोलताना भासत आहे. त्यामुळे चाहत्यांनी या व्हिडिओचा संबंध धोनीच्या निवृत्तिशीही जोडला आहे. चाहत्यांच्या मते कदाचित साक्षी हा धोनीचा शेवटचा सामना असल्याचे सांगत असावी.
धोनीने आत्तापर्यंत जेव्हाही मोठे निर्णय घेतले आहेत, ते अचानक कोणताही गाजावाजा न करता घेतले आहेत. त्यामुळे आता तो खरंच दिल्ली विरूद्धच्या सामन्यानंतरही अशाचप्रकारे अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार आहे का? अशा चर्चा होत आहेत.
त्यातच यापूर्वीच धोनीने असेही म्हटले होते की त्याला शेवटचा सामना चेपॉकवर खेळायचा आहे. त्यामुळे आता नेमकं धोनीच्या मनात काय आहे, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.
स्टीफन फ्लेमिंग काय म्हणाले?दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांना धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी ते म्हणाले, 'याबद्दल बोलणं माझं काम नाही. मला काहीच कल्पना नाही. मी त्याच्यासोबत काम करण्याचा आजूनही आनंद घेत आहे. तो अद्यापही मजबूतीने पुढे जातोय. याबद्दल मी त्याला या दिवसांमध्ये याबद्दल विचारतही नाहीये. तुम्हीच याबद्दल विचारत आहात.'
दरम्यान, धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २६८ सामने खेळले असून २४ अर्धशतकांसह ५३१९ धावा केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षक म्हणून १९४ विकेट्स घेतले आहेत. यामध्ये १४९ झेल आणि ४५ यष्टीचीतचा समावेश आहे.