पुणे - आपल्या बहारदार आवाजाने आणि वैविध्यपूर्ण गीतांनी हिंदी व मराठी चित्रपटसंगीतात आपला ठसा उमटवणारे प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांच्या संगीत मैफिलीची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे १० मे रोजी ‘शंकर महादेवन- लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मैफील १० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे ‘फायनान्स पार्टनर’ असून ‘द नेचर-मुकाईवाडी’, ‘वन वर्ल्ड बिझिनेस कन्सल्टंट’ आणि ‘डॉक्टर्स युनायटेड वर्ल्डवाईड’ हे सहयोगी प्रायोजक आहेत.
शंकर महादेवन हे ३० वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘ब्रेथलेस’, ‘मितवा’, ‘सिनेमावाले’, ‘गल्ला गुडियाँ’, ‘खलबली’, ‘दिल चाहता है’ यांसारखी त्यांनी गायलेली अनेक गीते लोकप्रिय आहेत. त्यांनी एहसान आणि लॉय यांच्यासह ‘दिल चाहता है’, ‘कल हो ना हो’, ‘तारे जमीन पर’, ‘लक बाय चान्स’, ‘झनकार बीट्स’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘२ स्टेट्स’, ‘दिल धडकने दो’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांना संगीतही दिले आहे.
‘शंकर महादेवन- लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या कार्यक्रमात यातील बहुतांश गीते ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ महादेवन आणि शिवम महादेवन हे देखील सहभागी होणार आहेत. हे दोघेही तरुण पिढीतील प्रतिभावान कलाकार असून त्यांनी स्वतंत्रपणे हिंदी व मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात काम केले आहे. या कार्यक्रमाची तिकिटे bookmyshow.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
कार्यक्रमाविषयी
कधी : १० मे २०२५
काय : ‘शंकर महादेवन- लाईव्ह इन कॉन्सर्ट’
केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता
कोठे : सूर्यकांत काकडे फार्म, कोथरूड