Ashwini Bidre killing Case : अभय कुरुंदकरसह दोघे जण दोषी, अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी कोर्टाचे आदेश; शिक्षा अकरा एप्रिलला सुनावणार
esakal April 06, 2025 11:45 AM

पनवेल : देशभर गाजलेल्या अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर व त्यास मदत करणारे आरोपी कुंदन भंडारी व महेश फळणीकर या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी शनिवारी दोषी ठरविले. अश्विनी बिद्रे हत्याकांड हे दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे मत नोंदवीत न्या. पालदेवार यांनी तिन्ही आरोपींना ११ एप्रिल रोजी शिक्षा ठोठावणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान या हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी राजू पाटीलची मात्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.

आरोपी अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांची निर्घृणपणे हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते भाईंदरच्या खाडीत टाकून दिले होते. आरोपी स्वत: एक पोलिस अधिकारी असल्याने त्याने आपल्या कौशल्याचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले; कुरुंदकरने बनावट रेकॉर्ड तयार करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कुरुंदकरविरुद्ध हत्या, बनावट रेकॉर्ड तयार करणे तसेच वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याचे न्या. पालदेवार यांनी स्पष्ट केले.

दोघेजण असे अडकले

अश्विनी यांची हत्या झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरचा वाहनचालक कुंदन भंडारीने मृतदेहाचे तुकडे करून ते गोणीत भरले, तर कुरुंदकरचा मित्र महेश फळणीकरने गोणीत भरलेला अश्विनीचा मृतदेह भाईंदरच्या खाडीत टाकण्यास मदत केली. भाईंदर येथील ज्या घरात कुरुंदकरने अश्विनी यांची हत्या केली, त्या घराच्या भिंतीवरील रक्ताचे डाग मिटविण्यासाठी कुंदनने पेंटर आणून ते रंगविले तसेच मृतदेहाची गाडी नेण्यासाठी वापरलेल्या गाडीचीही रंगरंगोटी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालयाने कुंदन भंडारी व महेश फळणीकर या दोघांना गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याने दोषी ठरविले आहे. दरम्यान, अश्विनी यांच्या हत्येच्या कटात राजू पाटीलचा प्रत्यक्ष सहभाग असल्याच्या पुराव्यांअभावी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

त्यांच्यावर कारवाई करा

अश्विनी बिद्रे यांच्या बेपत्ता होण्यामागे अभय कुरुंदकरचा हात असल्याबाबत विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले जात असताना तसेच कुरुंदकर हा सहा महिन्याच्या रजेवरून परत आल्यानंतरही त्याचे नाव राष्ट्रपती पदकासाठी राज्य सरकारकडून सूचविण्यात आले होते, ही बाब गंभीर असल्याचे न्या. पालदेवार यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासात हयगय व निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.

कुरुंदकरकडून पदाचा दुरुपयोग

मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हा पोलिस अधिकारी असल्याने त्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अश्विनी यांच्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. त्यानंतर उच्च न्यायालयाने यासंदर्भात विचारणा केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तोपर्यंत वर्षभर या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. जानेवारी २०१७ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर डिसेंबरमध्ये आरोपीला अटक झाल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.