उरण, ता. ६ (वार्ताहर) : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार भरवला होता. या वेळी सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी उरण पूर्व विभागातील एनएमएमटीची बससेवा सुरू करणे व फेऱ्या वाढविण्याच्या अनुषंगाने वनमंत्री गणेश नाईक यांच्या दरबारात समस्या मांडून लेखी निवेदन दिले.
नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाचे व्यवस्थापक योगेश कडूसकर हेसुद्धा या वेळी उपस्थित होते. लवकरच उरण पूर्व विभागातून जुईनगर ते कोप्रोली व कळंबोली ते कोप्रोली ही बससेवा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गणेश नाईक यांच्याकडून देण्यात आले. अनेक महिन्यांपासून बंद असलेली उरण तालुक्यातील पूर्व विभागातील एनएमएमटी बस लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पूर्व विभागातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. या वेळी दिवंगत नीलेश शशिकांत म्हात्रे यांच्या कुटुंबीयांना एनएमएमटी प्रशासनाकडून आर्थिक मदत करण्यात आल्याबद्दल व्यवस्थापक योगेश कडूसकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अविनाश म्हात्रे आणि विनय म्हात्रे उपस्थित होते.