नागपूर : अवकाळीचा प्रभाव ओसरताच विदर्भात पुन्हा उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. रविवारी कमाल तापमानाने आणखी उसळी घेत ४४ च्या दिशेने झेप घेतली आहे. मराठवाड्यातही उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पारा ४२.२ अंशांवरउष्णलाटेमुळे चोवीस तासांत नागपूरचा पारा दोन अंशांनी वाढून या मोसमात प्रथमच ४२.२ वर गेला. नागपूरकरांनी आज गेल्या दोन वर्षांतील सर्वात उष्ण दिवस अनुभवला. उन्हाचा सर्वाधिक फटका अकोलावासीयांना बसला. येथे विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरच्याही कमाल तापमानात दोन अंशांची वाढ होऊन पारा उच्चांकी ४२.२ वर गेला. मागील तीन दिवसांत तब्बल १४ अंशांची वाढ झाली आहे. बुलडाणा वगळता संपूर्ण विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा पारा चाळीसच्या वर गेला. अकोल्यापाठोपाठ ब्रह्मपुरी येथे ४२.९ अंश सेल्सिअस, अमरावती व चंद्रपूर येथे ४२.६ अंश सेल्सिअस, यवतमाळ येथे ४२.४, वर्धा येथे ४१.१ अंश सेल्सिअस, गोंदिया येथे ४०.४ अंश सेल्सिअस आणि भंडारा येथे ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली.
मराठवाड्यातही पारा चाळीशीच्या जवळ जात आहे. या विभागातील परभणीमध्ये तापमान ३८.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. नाशिकमध्येही आज पारा ४०.२ पर्यंत गेला होता. मालेगाव, धुळे, जळगाव आणि यवतमाळ येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तसेच नाशिक, सोलापूर, जेऊर, छत्रपती संभाजीनगर, परभणी (कृषी), भंडारा, बुलडाणा, गडचिरोली आणि वर्धा येथे तापमान ३९ अंशांपेक्षा अधिक होते. उद्या (ता. ७) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यासह दक्षिण भारतात ढगाळ हवामान आहे.
४० अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :अकोला ४३.२
ब्रह्मपुरी ४२.९
चंद्रपूर ४२.६
अमरावती ४२.६
यवतमाळ ४२.४
नागपूर ४२.२
गोंदिया ४०.४
भंडारा ४०.२
नाशिक ४०.२