पीएमपीएमएलकडून औंध येथून नवीन तीन मार्गावर बससेवा सुरु
esakal April 07, 2025 03:45 PM

औंध येथून नवीन तीन मार्गांवर पीएमपी बससेवा
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील प्रवाशांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ६ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) औंध बसस्थानकातून औंध ते मुकाई चौक रावेत (बसमार्ग क्र. ३४), औंध ते नीलसॉफ्ट कंपनी हिंजवडी फेज ३ (बसमार्ग क्र. १२४) आणि औंध ते आळंदी (बसमार्ग क्र. ३६०-अ) हे तीन नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे औंध परिसरातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांच्या मध्यभागी असलेल्या औंध भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पीएमपीच्या संचलनात असलेल्या मार्गांवरील नियोजित फेऱ्या पूर्ण होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांनी वारंवार जादा बसची मागणी केली जात होती. मात्र, वाहतूक कोंडीमुळे जादा बस सोडूनदेखील प्रवाशांना बससाठी वाट पाहावी लागत होती. यावर औंध जकात नाक्याची जागा बस स्थानकामध्ये विकसित करुन येथूनच बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे स्थानक मंगळवार (ता. १) पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले असून या स्थानकावरुन औंध ते मुकाई चौक रावेत, औंध ते नीलसॉफ्ट कंपनी हिंजवडी फेज-३ आणि औंध ते आळंदी या तीन नवीन मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.