आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन चर्चेत आला आहे. अश्विन आपल्या कामगिरीमुळे नाही तर युट्यूब चॅनेलमुळे चर्चेत आला आहे. अश्विनने 2020 मध्ये एक यूट्यूब चॅनल सुरू केला. तो क्रिकेटशी संबंधित सामन्यांचे विश्लेषण करतो, विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देतो आणि त्याचे तसेच तज्ज्ञांचे मत मांडतो. पण आता अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर चेन्नई सुपर किंग्सबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही. अश्विनच्या युट्यूब चॅनेलवर चेन्नई सुपर किंग्सचा दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव झाल्यानंतर वादाला फोडणी मिळाली. 5 एप्रिलला झालेल्या सामन्यानंतर मॅच रिव्ह्यूसाठी चॅनेलवर प्रसन्ना अगोरम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या निवडीवर बोट ठेवलं होतं. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा सारखे वरिष्ठ गोलंदाज असूनही अफगाणिस्तानच्या नूर अहमदला खेळवल्याबद्दल चेन्नई सुपर किंग्स संघावर टीका केली. नूर अहमद ऐवजी एक अतिरिक्त फलंदाज प्लेइंग 11 मध्ये घ्यायला हवा होता. कारण संघात आधीच जडेजा आणि अश्विन दोघेही होते. यानंतर अश्विनचं चॅनेल ट्रोल झालं आणि सोशल मीडियावर चाहत्यांनी फिरकी घेतली.
अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवरून सदर व्हिडिओ काढून टाकला आहे. अश्विनच्या यूट्यूब चॅनल एडमिनने आता खुलासा करत सांगितलं की, अश्विनच्या युट्यूब चॅनेलवर सीएसके सामन्यांबाबत कोणतेही विश्लेषण होणार नाही. आयपीएल हंगाम संपेपर्यंत चेन्नई सुपर किंग्सबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही. अश्विन आधीच चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत आहे. त्यामुळे त्याच्या युट्यूब चॅनेलवर संघाबाबत टीका करणे योग्य नसल्याचं मत अनेकांनी वर्तवलं होतं. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असे दिसते. दुसरीकडे, नूर अहमद या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. तो आता पर्पल कॅपचा मानकरी आहे.
अश्विनच्या यूट्यूब चॅनलने एक अधिकृत निवेदन जारी करत म्हंटलं की, “गेल्या आठवड्यात या चॅनेलवर झालेल्या चर्चेनंतर आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही यापुढे चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यांचे प्रिव्ह्यू, रिव्ह्यू आणि इतर कव्हरेज करणार नाही. आमच्या चॅनेलवर पाहुणे जे काही मत व्यक्त करतात ते अश्विनचे वैयक्तिक मत नाही. आम्ही या प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता आणि उद्देश राखण्यासाठी वचनबद्ध आहोत.”