मुरबाड (वार्ताहर)ः मुरबाड तालुक्यातील कोरावळे येथील जिल्हा परिषद शाळेतील माजी मुख्याध्यापक दिगंबर पोटे यांची पदोन्नती झाल्याबद्दल गौरव करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. या वेळी दिगंबर पोटे यांनी आपल्या कार्यकाळात शाळेला एक नवी दिशा दिली. त्यांनी शालेय प्रशासनात शिस्त आणि गुणवत्ता आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने शैक्षणिक आणि सह-शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शाळेला अनेक सन्मान मिळवून दिल्याचे मत या वेळी शिक्षकांनी व्यक्त केले. या वेळी आठवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात, वर्गशिक्षक कृष्णकांत मलिक यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. शाळेतील इतर शिक्षक, सीमा सोनवणे, शोभा उबाळे, अनिल भोईर, प्रशांत माळी, प्रतीक्षा धुमाळ आणि वृषाली धुमाळ यांनीही शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.