मंदी आलीय का, SIP वाढवावी का, मार्केट अजून किती कोसळणार, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
Marathi April 07, 2025 08:25 PM

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या आयात शुल्काचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये गुंतवणूकदारांना लाखो कोटी रुपये गमवावे लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये काहीशी घसरण असल्याचं दिसून येतंय. त्यातच ट्रम्प यांच्या धोरणामुळे टॅरिफ वॉर सुरू होऊन जागतिक मंदी निर्माण होते की काय अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात SIP थांबवावी का, किंवा पैसे काढून घ्यावेत का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. तसेच सध्याची परिस्थिती एसआयपीमध्ये नव्याने गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे का? या सर्वांवर सीए आणि आर्थिक सल्लागार रचना रानडे यांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत.

SIP होल्ड करावी का?

रचना रानडे : सध्याची परिस्थिती ही काही काळापुरती असू शकेल. यातून मार्केट पुन्हा रिकव्हर होऊ शकते. त्याचमुळे सध्या एसआयपी थांबवू नयेत. त्या चालूच ठेवाव्यात. सध्याचा गुंतवणुकीचा पॅटर्न कायम ठेवावा.

आताच्या परिस्थितीला घाबरून जाण्याची गरज नाही. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातून आपण बाहेरही पडलो आहे. हवेत हेलखावे घेतले म्हणून विमानातून उडी घेत नाही, तशीच मार्केटची सद्यस्थिती आहे. घाबरुन जाऊ नका.

SIP पैसे काढून घ्यावेत का?

रचना रानडे : तुम्ही जर कमी काळासाठी गुंतवणूक करणार असाल तर पैसे काढून घ्यावेत असं आपण नेहमी म्हणतो. पण जर मोठ्या कालावधीसाठी, आठ ते दहा वर्षांसाठी गुंतवणूक करणार असाल तर त्यांनी आजिबात थांबू नये. भविष्यात त्याचा फायदा नक्की मिळेल.

SIP गुंतवणूक वाढवावी का?

रचना रानडे : पूर्वी जी मंदी आली होती त्याचे विश्लेषण करावं. ज्याच्याकडे अधिकचा पैसा असेल तर त्यांनी एसआयपी वाढवावी. अन्यथा सध्या एसआयपी लगेच वाढवू नये.

कुणाच्या सांगण्यावरून जर एसआयपी केली तर त्यामध्ये काहीसा धोका असू शकतो. पण तुम्ही त्याचे विश्लेषण करुन गुंतवणूक केला असाल तर अशा संकटांना तुम्ही चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता.

सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का?

रचना रानडे : सोन्याची किंमत आता खूपच उच्च स्तरावर आहे. या क्षणी त्यामध्ये गुंतवणूक करणे म्हणजे काहीसा धोका असू शकतो.

अजय वाळिंब यांचा गुंतवणूकदारांसाठी सल्ला काय?

या प्रकरणी अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे यांनीही मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की, ट्रम्प यांनी सुरू केलेलं टॅरिफ वार हे मोठ्या कालावधीसाठी सुरू राहिलं तर ते कदाचित न्युक्लिअर वॉरपेक्षा भयंकर असेल.  पण ही परिस्थिती कायम राहणार नाही असं वाटतंय. होल्ड करण्याची ही परिस्थिती आहे असं दिसतंय.

जागतिक मंदीचा काळ आणि आताचा काळ याकडे कसे पाहणार? या प्रश्वावर बोलताना ते म्हणाले की, “जागतिक मंदी आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. जागतिक मंदी ही सुरू झाल्यानंतर कळली. आता हे ट्रेड वॉर सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे हे मानवनिर्मित आहे.”

मंदीचा काळ किती असेल यावर सर्व काही अवलंबून असेल. ट्रम्प यांनी सुरू केलेलं हे वॉर किती महिने चालणार यावर अनेक मंदी आणि महागाईसह इतर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. पण हे संकट लवकर निवळू शकेल असं वाटतंय.

म्युच्युअल फंड करताना मल्टी असेट्स गुंतवणूक करावी. पण सध्याच्या काळात संयम महत्त्वाचा आहे. शेअर बाजारात जर चांगली संधी दिसत असेल तर त्यामध्येच गुंतवणूक करावी असं अजय वाळिंब म्हणाले.

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक टाळलेली बरी. कारण आपल्या देशात ते अवैध्य आहे असा सल्ला अजय वाळिंब यांनी दिला.

https://www.youtube.com/watch?v=etr_kwkz8fo

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.