Hanuman Jayanti 2025: यंदा हनुमान जयंती कधी? जाणून घ्या तारीख, वेळ आणि पूजा विधी
esakal April 07, 2025 11:45 PM

Hanuman Jayanti Puja Timings: दरवर्षी हनुमान जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार, याच दिवशी श्रीहनुमानाचा जन्म झाला होता. संपूर्ण देशात असंख्य भाविक या दिवशी भक्तिभावाने हनुमानाची पूजा अर्चना करतात. याशिवाय मारुतीस्तोत्राचे, हनुमानचालिसा यांचे सामूहिक पठण केले जाते.

तारीख आणि वेळ

यंदा हनुमान जयंती १२ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. वैदिक पंचांगानुसार, चैत्र पौर्णिमा तिथी १२ एप्रिल रोजी पहाटे ३.२१ वाजता सुरु होऊन १३ एप्रिल रोजी सकाळी ५.५१ वाजता संपेल. परंतु परंपरेनुसार १२ एप्रिलला हनुमान जयंती साजरी केली जाईल.

हनुमान जयंतीची पूजा विधी

- हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला असल्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात ब्रह्म मुहुर्तावर म्हणजेच पहाटे उठून करा.

- घराची साफसफाई करून घरात गंगाजल शिंपडा, ज्यामुळे घरात मंगलमय वातावरण तयार होईल.

- त्यानंतर अंघोळ करा आणि मंदिरात किंवा घरच्या घरीच हनुमानाची पूजा करा.

- पूजा केल्यानंतर हनुमानाला सिंदूर लावा आणि वस्त्र अर्पण करा.

- याव्यतिरिक्त हनुमानाला प्रिय असलेले चमेलीचे तेलही अर्पण करा.

- सगळी पूजा झाल्यानंतर फुले, धूप, पान, गुलकंद आणि बदाम वाहून नैवेद्य अर्पण करा.

- नंतर हनुमान चालिसा, सुंदरकांड, मारुतीस्तोत्र याचे पठण करा आणि शेवटी आरती करून प्रसाद वाटा.

हनुमान जयंतीचे महत्त्व

श्रीहनुमानाचा जन्म मंगळवारी झाला होता, म्हणून मंगळवार हा दिवस त्याच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. याव्यतिरिक्त शनिवार देखील पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो. भगवान शंकराचा अकरावा रूद्रावतार असलेल्या हनुमानामध्ये अपार शक्ती, भक्ती आणि बुद्धी यांचा संगम पाहायला मिळतो. अंजनी आणि केसरी यांचे पुत्र असूनही त्यांना पवनदेवांचा आशीर्वाद लाभल्यामुळे पवनपुत्र म्हणूनही ओळखले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.