रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात (Ipl 2025) इतिहास घडवला आहे. विराटने या हंगामातील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) वानखेडे स्टेडियममध्ये महारेकॉर्ड केला आहे. विराटने टी 20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहली अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय तर एकूण पाचवा फलंदाज ठरला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीकडून फिल सॉल्ट याच्या सोबत विराट सलामीला आला. विराटच्या नावावर या सामन्याआधी टी 20 क्रिकेटमध्ये 12 हजार 983 धावा होत्या. त्यामुळे विराटला 13 हजारांसाठी 17 धावांची गरज होती. विराटने 17 धावा पूर्ण करताच मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं. विराटआधी ख्रिस गेल. एलेक्स हेल्स, शोएब मलिक आणि किरोन पोलार्ड या फलंदाजांनी ही कामगिरी करुन दाखवली आहे.
विराटने यासह आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली. विराट वेगवान 13 हजार धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला. विराटने 386 टी 20 डावांमध्ये ही कामगिरी केली. तसेच वेगवान 13 हजार धावांचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने विराटच्या तुलनेत 5 डावांआधी 13 हजार धावा केल्या आहेत. गेलने 381 डावांमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.
13 हजारी विराट कोहली
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विघ्नेश पुथूर.