इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (७ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर १२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात मोक्याच्या क्षणी बंगळुरूसाठी भुवनेश्वर कुमारने तिलक वर्माची घेतलेली विकेट महत्त्वाची ठरली. या विकेटसह भूवीने आयपीएलमध्ये एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
या सामन्यात बंगळुरूने मुंबईसमोर २२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने १२ व्या षटकापर्यंत ९९ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी आक्रमक खेळ केला.
एका बाजूने हार्दिक वादळी खेळ करत असताना त्याला तिलकने तोलामोलाची साथ देत होता. त्यांच्यात ३४ चेंडूतच ८९ धावांची भागीदारीही झाली. तिलकने या भागीदारीदरम्यान अर्धशतकही पूर्ण केले. त्यांच्या या खेळाने मुंबईच्या विजयाच्या आशा जाग्या झाल्या होत्या.
पण १५ चेंडूत ३४ धावांची गरज असताना तिलक वर्माविरुद्ध स्लोअर बॉल टाकला आणि त्याला चकवले. तिलकचा झेल फिल सॉल्टने घेतला. त्यामुळे तो २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावा करून बाद झाला. ही भूवनेश्वर कुमरची आयपीएल कारकिर्दीतील १८४ वी विकेट ठरली. त्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला.
त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला. ब्रावोने १६१ सामन्यांत आयपीएलमध्ये १८३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या एकूण गोलंदाजांमध्ये भूवी आता युझवेंद्र चहल आणि पीयूष चावलानंतर तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
दरम्यान, तिलक बाद झाल्यानंतर १५ चेंडूत ४२ धावांची वादळी खेळी करून हार्दिक पांड्याही जोश हेजलवूडविरुद्ध खेळताना बाद झाला. शेवटच्या षटकात कृणाल पांड्याने ३ विकेट्स घेतल्या.
त्यामुळे मुंबईला २० षटकात ९ बाद २०९ धावांपर्यंतच पोहचता आले, त्यामुळे त्यांना १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरूकडून कृणालने एकूण ४ विकेट्स घेतल्या, तर यश दयाल आणि जोश हेजलवूड यांनी २-२ विकेट्स घेतल्या, तर भूवीने एक विकेट घेतली.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (७ एप्रिलपर्यंत)२०६ विकेट्स - युझवेंद्र चहल (१६३ सामने)
१९२ विकेट्स - पीयूष चावला (१९२ सामने)
१८४ विकेट्स - भूवनेश्वर कुमार (१७९ सामने)
१८३ विकेट्स - ड्वेन ब्रावो (१६१ सामने)
१८३ विकेट्स - आर अश्विन (२१६ सामने)
१८२ विकेट्स - सुनील नरेन (१८० सामने)
१८४ विकेट्स - भूवनेश्वर कुमार (१७९ सामने)
१८३ विकेट्स - ड्वेन ब्रावो (१६१ सामने)
१७० विकेट्स - लसिथ मलिंगा (१२२ सामने)
१६५ विकेट्स - जसप्रीत बुमराह (१३४ सामने)
१४४ विकेट्स - उमेश यादव (१४८ सामने)